पण कबरीचे उदात्तीकरण होऊ देणार नाही : मुख्यमंत्री
मुंबई : प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाची कबर हटविण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झालेल्या असल्या तरी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावध पवित्रा घेत आपल्याला आवडो न आवडो, मात्र हे मान्य करावेच लागेल की, औरंगजेबाची कबर ही भारतीय पुरातत्व खात्याच्या अखत्यारित येते. या कबरीला भारतीय पुरातत्व खात्याने संरक्षण दिले आहे. त्यामुळे कबर तिथून हटवता येणार नाही, असे पुन्हा एकदा सांगितले. यावेळी त्यांनी औरंगजेबाचे उदात्तीकरण आम्ही कदापि मान्य करणार नाही, असे म्हटले.
छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून औरंगजेबाच्या विरोधात राज्यभरात रोष पाहण्यास मिळाला. खासदार उदयनराजे भोसले यांनी औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याची मागणी केली. त्यानंतर काही हिंदुत्ववादी संघटनांनीही असाच इशारा दिला. गरज पडल्यास कारसेवा करु आणि कबर हटवू असेही या संघटनांनी सांगितले. यानंतर औरंगजेबाच्या कबरीला अरक म्हणजेच भारतीय पुरातत्व खात्याने संरक्षण दिले आहे. राज ठाकरे यांनीही ही कबर उखडू नका उलट तिथे फलक लावा आणि मराठ्यांनी औरंगजेबाला इथे गाडला हे सगळ््यांना सांगा, अशी भूमिका घेतली. त्यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही कबर हटवता येणार नाही, असे म्हटले. त्यामुळे औरंगजेबाच्या कबरीविरोधातील वादळ पुन्हा थंड होण्याची शक्यता आहे.
