हाहाकार, १.७ ट्रिलियन डॉलरचा चुराडा
वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या व्यापार कराचा त्यांच्या शेअर बाजारावर नकारात्मक परिणाम झाला असून, आज अमेरिकन बाजार उघडताच एस अँड पी ५०० निर्देशांकातील अंदाजे १.७ ट्रिलियन डॉलर्सचा चुराडा झाला. ट्रम्प इतर देशांना धडा शिकवायला गेले आणि अमेरिकेत भलतेच घडले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार कर लादण्याच्या घोषणेमुळे आर्थिक मंदीची भीती वाढल्याने अमेरिकेच्या शेअर बाजारात ही परिस्थिती निर्माण झाली.
बाजारातील या घसरणीचा सर्वाधिक फटका ज्या कंपन्या परदेशी उत्पादनांवर अवलंबून आहेत, अशा कंपन्यांना बसला. अमेरिकेत विक्री होणा-या बहुतेक उपकरणांचे उत्पादन चीनमध्ये करणा-या ऍपल इंकच्या शेअर्समध्ये ८ टक्के घट झाली तर व्हिएतनामध्ये उत्पादन होणा-या लुलुलेमॉन ऍथलेटिका आणि नाईकीच्या शेअर्समध्ये सुमारे १० टक्के घसरण झाली.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे २०२२ नंतर पहिल्यांदाच अमेरिकन बाजाराच्या बेंचमार्क निर्देशांकात सर्वात मोठी घसरण झाली. न्यू यॉर्कमध्ये गुरुवारी सकाळी ९.३५ वाजेपर्यंत, एस अँड पी ५०० निर्देशांकातील कंपन्यांपैकी सुमारे ७० टक्के कंपन्यांना तोटा सहन करावा लागला, जवळजवळ निम्म्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये २ टक्के किंवा त्याहून अधिक घसरण झाली.
भारताला भरावा लागणार
२६ टक्के व्यापारी कर
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज देशभरातील अनेक देशांवर व्यापार कर लादण्याची घोषणा केली आहे. यामध्ये भारत आणि चीनसारख्या देशांचाही समावेश आहे. अमेरिकेने सर्व देशांवर सरसकट १० टक्के आयात शुल्क लागू केले तर, काही देशांवर परस्पर आयात शुल्क लागू केले. म्हणजेच जे देश आधीपासून अमेरिकेकडून कर वसूल करत आहेत त्या-त्या देशांकडून अमिरिकेनेही तितकंच (किंवा त्या प्रमाणात) आयात शुल्क वसूल करण्यास सुरुवात केली. यात भारताचाही समावेश आहे. अमेरिकेने भारतावर २६ टक्के, चीनवर ३४ टक्के, व्हिएतनामवर ४६ टक्के आयात शुल्क लागू केल्याचे वृत्त आहे.