मुंबई : प्रतिनिधी
भारतात अब्जाधिशांची संख्या मोठी आहे. त्यात अब्जाधीशांच्या संपत्तीचा विचार केल्यास ती अनेक देशांच्या जीडीपीहून अधिक असल्याचे दिसून येते. भारतीय उद्योगपतींकडे सौदी अरेबियाच्या जीडीपीपेक्षा जास्त संपत्ती असल्याचं हुरुन ग्लोबल रिच रिपोर्टमधून समोर आले आहे. भारतात या घडीला २८४ अब्जाधीश असल्याचे हुरुन ग्लोबल रिच लिस्टमधून स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत देशातील अब्जाधीशांच्या संख्येत १३ ने वाढ झाली आहे. भारतीय उद्योगपतींची एकूण संपत्ती ९८ लाख कोटींवर असल्याचे अहवालात म्हटले आहे.
या सर्व अब्जाधीशांची मालमत्ता एकत्र केली तर ती सौदी अरेबियाच्या अर्थव्यवस्थेपेक्षा जास्त होईल. हुरुन ग्लोबल रिच लिस्ट २०२५ नुसार भारतीय उद्योगपतींची एकूण संपत्ती ९८ लाख कोटी रुपये आहे. ही संपत्ती ही देशाच्या जीडीपीच्या सुमारे एक तृतीयांश आहे. संपत्तीचा हा आकडा सौदी अरेबियाच्या जीडीपीपेक्षा कितीतरी जास्त आहे. सौदीचा जीडीपी ९१.३५ लाख कोटी इतका आहे.
हुरुन ग्लोबल रिच लिस्टनुसार भारतातील अब्जाधीशांच्या संपत्तीत गेल्या वर्षीच्या तुलनेत १० टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे देशाच्या जीडीपीमध्येही वाढ झाल्याचे स्पष्ट होते. भारतीय अब्जाधीशांच्या संपत्तीने ट्रिलियन डॉलर्सचा आकडा पार केला आहे आणि हे समृद्धीच्या नव्या युगाचे लक्षण आहे. विशेष म्हणजे ६२ टक्के अब्जाधीशांच्या संपत्तीत यंदा वाढ झाली आहे.
अदानींच्या संपत्तीत
झाली सर्वाधिक वाढ
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे सर्वांत श्रीमंत भारतीय आहेत. त्यांची एकूण संपत्ती ही ८.६ लाख कोटी रुपये इतकी आहे. तसेच ते सर्वात श्रीमंत आशियाई आहेत. दरम्यान, अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानींच्या संपत्तीत सुमारे १ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. भारतीय श्रीमंताच्या संपत्तीच्या वाढीमधील ही सर्वाधिक वाढ आहे. अदानीची एकूण संपत्ती १३ टक्क्यांनी वाढली. त्यांची एकूण संपत्ती ८.४ लाख कोटी आहे. अदानी हे श्रीमंत भारतीयांच्या यादीत दुस-या क्रमांकावर आहेत. रोशनी नाडर यांचे वडील शिव नाडर यांनी एचसीएल टेक्नॉलॉजीजमधील ४७ टक्के स्टेक हे रोशनींच्या नावावर हस्तांतरीत केले. त्यामुळे ३.५ लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह रोशनी नाडार या तिस-या क्रमांकाच्या श्रीमंत भारतीय व्यक्ती ठरल्या. सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजचे दिलीप सांघवी हे चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत भारतीय आहेत. सांघवी यांची संपत्ती २.५ लाख कोटी रुपये आहे. अझीम प्रेमजी २.२ लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह ५ व्या क्रमांकावर आहेत.
