मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील रेडी रेकनरच्या दरात ४.३९ टक्क्यांनी वाढ करण्यात आली. त्यामुळे राज्यात घर आणि मालमत्ता खरेदी करणं आणखी महागणार आहे. गेली तीन वर्षे रेडी रेकनरच्या दरात राज्याच्या नोंदणी आणि मुद्रांक विभागाकडून कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती. मात्र यावेळी राज्यातील सर्वच विभागांत रेडी रेकनरचे दर वाढवण्यात आले असून १ एप्रिल २०२५ पासून नवीन दरांची अंमलबजावणी करण्यात आली. शहरी भागात ही वाढ ५.९५ टक्के तर ग्रामीण भागात ही वाढ ३.३६ टक्के असणार आहे.
कोरोनाचे संकट आणि त्याचा बाजारपेठांवर झालेला परिणाम लक्षात घेऊन राज्य सरकारने गेल्या तीन वर्षांत रेडी रेकनरच्या दराची फेररचना केली नव्हती. सध्या लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे. त्यातच राज्य सरकारला मुद्रांक शुल्क आणि नोंदणीच्या माध्यमातून अधिक महसुलाची अपेक्षा आहे. आता रेडी रेकनरच्या दरात मोठी वाढ झाल्याने मालमत्तांचे दर वाढणार असून घर खरेदीदारांवर त्याचा अधिक बोजा पडणार आहे. मीरा-भाईंदरमध्ये ६.२६ टक्के, कल्याण- डोंबिवलीत ५.८४ टक्के, नवी मुंबईत ६.७५ टक्के, पुण्यात ४,१६ टक्के, नाशिकमध्ये ७,३१ टक्के अशी वाढ जाहीर करण्यात आली.
नगरपरिषद/पंचायत क्षेत्र – ४.९७ टक्के
सदनिकांचे दर महापालिका क्षेत्राकरिता जमीन दर अधिक बांधकाम दर यांपेक्षा कमी असल्यास ते किमान जमीन दर अधिक बांधकाम दर याप्रमाणे ठेवण्यात आले आहेत. प्रभाव क्षेत्र आणि ग्रामीण क्षेत्रात सदनिकांचे दर किमान बांधकामाएवढे येत नसल्यास, ते किमान बांधकाम दराइतके ठेवण्यात आले आहेत. चुकीचे मूल्यांकन असलेले झोन बदलण्यात आले असून, त्यांचे मूल्यांकन आता बाजारभावाशी करण्यात आले आहे. सर्वेक्षण क्रमांक किंवा गट क्रमांक याप्रमाणे बदलाची नोंद घेण्यात आली आहे, असे सांगण्यात आले.
