मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती
मुंबई : महायुती सरकार स्थापन झाल्यापासून सर्व ४८ विभागांनी पहिल्या १०० दिवसांत घेतलेले निर्णय, धोरणांचा आढावा घेण्यासाठी सुरू केलेल्या कार्यक्रमात निश्चित ९०२ उद्दिष्टांपैकी ७०६ म्हणजे, ७८ टक्के उद्दिष्ट्ये साध्य झाली आहेत. उर्वरित १९६ उद्दिष्ट्ये देखील लवकरच पूर्ण होतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्र्यांनी “एक्स” या सोशल मीडियावर पोस्ट करून १०० दिवसांच्या आढावा कार्यक्रमाची विस्तृत माहिती दिली आहे. एकूण ४८ विभागांपैकी १२ विभागांनी आपली १०० टक्के उद्दिष्ट्ये पूर्ण केली आहेत तर आणखी १८ विभागांनी ८० टक्क्यांपेक्षा जास्त उद्दिष्ट्ये साध्य केली आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.
या परिवर्तनशील व सर्वंकष विकासाच्या वाटचालीच्या मोहिमेत सर्व विभागांनी केलेल्या अतिशय प्रभावी कामगिरीबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांनी भविष्यात सुद्धा अशीच चांगली कामगिरी करावी, यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले आहे.
राज्यसरकारने हाती घेतलेली नवीन धोरणे व लोकाभिमुख निर्णयांची माहिती आणि दूरगामी परिणाम जनतेपर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने १०० दिवसांचा धोरणात्मक कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेला आहे.