नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतातर्फे सध्या शुभांशू शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर उपस्थित आहेत. गेल्या आठवड्यात शुभांशू आणि त्यांचे इतर तीन सहकारी अंतराळवीर १४ दिवसांसाठी अंतराळात गेले आहेत. ही एक खाजगी मोहीम आहे, जी ॲक्सिओम स्पेस कंपनीद्वारे चालवली जात आहे. शुभांशूच्या या अंतराळ मोहिमेबद्दल अनेक प्रश्न आहेत. त्यातच आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर ९० मिनिटांचा एक दिवस असल्याची माहिती आहे. पृथ्वीवर २४ तासांचा एक दिवस,म्हणजेच दिवसातून एकदा सूर्योदय आणि सूर्यास्त होतो. पण आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात २४ तासांत सूर्योदय १६ वेळा होतो आणि सूर्यास्त १६ वेळा होतो. अशाप्रकारे पाहिले तर तिथे एक दिवस आणि एक रात्र ९० मिनिटांची असते. मात्र पृथ्वीवर हा कालावधी १२-१२ तासांचा असतो. कारण अंतराळ स्थानक पृथ्वीभोवती खूप वेगाने फिरते आणि असे करण्यासाठी त्याला फक्त ९० मिनिटे लागतात.
पृथ्वीभोवती फिरताना, अंतराळ स्थानक हे ४५ मिनिटे सूर्यप्रकाशात राहते तर उर्वरित ४५ मिनिटे ते पृथ्वीच्या सावलीत राहते. २४ तासांमध्ये अंतराळ स्थानक हे १६ वेळा पृथ्वीभोवती फिरत असल्याने १६ सूर्यास्त आणि १६ सूर्योदय होतात. जर तिथल्या टाइम झोनबद्दल बोलायचे झाले तर तिथे कोऑर्डिनेटेड युनिव्हर्सल टाइम झोन जागतिक मानकांनुसार वापरला जातो, त्यामुळे जगातील विविध देशांशी समन्वय साधण्यात कोणतीही अडचण येऊ नये असा हेतू असतो. या टाइम झोनला ग्रीनविच मीन टाइम असेही म्हणतात.
कोणता टाइम झोन असतो उपयुक्त ?
अनेक देशांचे अंतराळवीर अंतराळ स्थानकावर एकत्र काम करतात आणि प्रत्येक देशाचा स्वतःचा टाइम झोन असतो. यूटीसीचा वापर हा सर्व मिशन कंट्रोल सेंटर आणि अंतराळवीरांना एकाच प्रणालीखाली आणतो, ज्यामुळे केवळ संवाद साधणे सोपे होत नाही तर आदेश देणे देखील सोपे होते. स्पेसमध्ये अमेरिका, रशिया, ब्रिटन आणि जपान सारख्या देशांमधील अंतराळवीर एका यूनिर्वसल टाइम झोनमध्ये काम करतात.
आत्ता स्पेस स्टेशनमध्ये आयएसएसवर किती वाजले असतील ?
जर ३० जून २०२५ रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार भारतात दुपारी १२:०२ वाजले असतील आणि भारतीय वेळ ही यूटीसीपेक्षा ५ तास ३० मिनिटे पुढे असेल तर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर यावेळी सकाळी ६:३२ वाजले असतील. हा काळ सर्व स्पेस मिशन मोहिमा, अंतराळवीर आणि मिशन कंट्रोल सेंटर्स यांच्यासाठी प्रमाणित आहे.