नारायणपूर : वृत्तसंस्था
छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या चकमकीदरम्यान, सकाळी ११ वाजेपर्यंत सुरक्षा दलांनी २६ नक्षलवाद्यांना ठार मारले तर या कारवाईत एक जवान शहीद झाला आहे. अबुझमद परिसरात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
या कारवाईबाबत नारायणपूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक प्रभात कुमार यांनी अधिक माहिती देताना जिल्ह्यातील अबुझमद भागातील माड विभागात नक्षलवाद्यांच्या उपस्थितीच्या माहितीच्या आधारे, जिल्हा राखीव रक्षक नारायणपूर, दंतेवाडा, विजापूर आणि कोंडागाव पोलिसांच्या संयुक्त पथकाने नक्षलवाद्यांच्या तळावर मोठी कारवाई सुरू केली आहे. या परिसरात अद्यापही सर्च ऑपरेशन सुरू आहे. किंबहुना नक्षलवाद्यांच्या मृत्यूचा आकडा वाढण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.
केंद्र सरकारने नक्षल्यांच्या विरोधात जोरदार मोहीम हाती घेतली आहे. एकीकडे नक्षल्यांना शरण येण्याचे आवाहन करून त्यांचे पुनर्वसन केले जात आहे तर दुसरीकडे नक्षली भागात धडक कारवाई करून नक्षल्यांचा प्रभाव नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे छत्तीसगड आणि महाराष्ट्राच्या सीमा भागात नक्षली येरियामध्ये धडक कारवाया सुरू आहेत. छत्तीसगडमधील नारायणपूर, बस्तर, बिजापूर, दंतेवाडासह महाराष्ट्राच्या सीमा भागात संयुक्त मोहीम राबविली जात आहे. त्यातच आजच्या कारवाईत आतापर्यंत २६ नक्षल्यांचा खात्मा झाल्याची माहिती देण्यात आली.