टॉवेल कारखान्याला लागली आग, दोन कुटुंबातील सदस्य दगावले
सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर येथील अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरातील सेंट्रल टेक्सटाईल या टॉवेल कारखान्याला रविवारी पहाटे भीषण आग लागली. या आगीत ८ जणांचा होरपळून मृत्यू झाला. आग चांगलीच भडकल्याने बचावकार्यात बरेच अडथळे आले. त्यातूनही ५ जणांना बेशुद्धावस्थेत बाहेर काढले आणि तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पाचही जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ८ झाला आहे. अगोदर जागेवर होरपळून तिघांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये कामगार आणि मालक कुटुंबातील सदस्यांचा समावेश आहे.
सेंट्रल टेक्सटाईल या टॉवेल कारखान्याला रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास आग लागली. याची माहिती सुरक्षारक्षकाला समजताच अग्निशामक दलाला याची माहिती दिली. तातडीने अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळ आल्या. कारखान्याच्या आतील भागात जाण्यासाठी अरुंद रस्ता असल्याने अडचणी निर्माण झाल्या. कारखान्याचे मालक उस्मान मन्सुरी तसेच एक कामगार कुटुंबीय असे एकूण ८ जण तेथेच राहत होते. मेहताब बागवान, त्यांची मुलगी हिना वसीम शेख आणि मुलगा सलमान मेहताब बागवान या तीन कामगार कुटुंबातील सदस्यांचे मृतदेह सकाळी बाहेर काढण्यात आले तर कारखान्याचे मालक उस्मान मन्सूरी यांच्या कुटुंबातील चार व कामगार कुटुंबातील एक अशा ५ जणांचा शोध सुरूच होता. हे सर्व पाच जण मास्टर बेडरुममध्ये लपून बसले होते. दुर्दैवाने त्यांना बाहेर पडता आले नाही. त्यामुळे श्वास गुदमरून आणि होरपळून त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.
मृतांची नावे
१) उस्मान मन्सुरी (८७), अनस मन्सुरी (२४), शिका मन्सुरी (२४), युसूफ मन्सुरी (१.६), आयेशा बागवान (४५), मेहताब बागवान (२१), हिना बागवान (३५), सलमान बागवान (१८)