मुंबई : प्रतिनिधी
गेल्या दोन दिवसांत महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा जोरदार फटका बसला आहे. मान्सूनपूर्व पाऊस आणि तीव्र वीजांमुळे राज्यात गेल्या ४८ तासांत अनेकांनी जीव गमावला आहे. दोन दिवसांत २३ ते २४ जणांचा मृत्यू झाला असून ११ जण जखमी झाले आहेत. पावसाचा फटका जनावरांनाही बसला असून आत्तापर्यंत ५५ प्राण्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.
राज्यात रोज अवकाळी पावसाचा धडाका सुरू असून, सोमवारी १० जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये पाच जणांचा वीज कोसळल्याने, तर पाच जणांनी पाण्यात बुडून जीव गमावला तर त्याच त्याच दिवशी ११ जण जखमी झाले. त्यापैकी ५ नागरिक हे वीज कोसळल्याने, चार जण झाड कोसळल्याने जखमी झाले तर दोघे जण पाण्यात बुडून जखमी झाले. याशिवाय विजेमुळे ५५ छोट्या प्राण्यांचा मृत्यू झाला. मंगळवारी आणखी १४ मृत्यू नोंदवले गेले, यामध्ये चार जणांचा वीज कोसळल्याने, एकाचा पाण्यात बुडून आणि दोघांचा झाड कोसळल्याने मृत्यू झाला.
दरम्यान, राज्यातील मान्सूनपूर्व पावसाचा धडाका सुरूच असून मुंबईसाठी आज यल्लो अलर्ट देण्यात आला तर ठाण्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टीवर जोरदार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला. गुरुवारी आणि शनिवारी ठाण्यासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईसाठीही शनिवारीपर्यंत यलो अलर्ट लागू असून, यामध्ये काही ठिकाणी जोरदार सरी, विजांचा कडकडाट आणि वारे यांचा समावेश आहे.
पूर्व-मोसमी पावसाला कारणीभूत ठरणाऱ्या घडामोडींमध्ये अरबी समुद्रात तयार होणारा कमी दाबाचा पट्टा, वाऱ्यांचा संमेलन बिंदू म्हणजेच कंव्हर्जंस, भरपूर आर्द्रता आणि स्थानिक तापमानवाढ यांचा समावेश आहे. कोकण किनारपट्टीलगत चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.