१० दिवसांपासून रोज हजेरी, उन्हाळी पिके, फळझाडांची हानी, पावसाचा आणखी जोर वाढणार
मुंबई : प्रतिनिधी
राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून, गेल्या १० दिवसांपासून रोजच पावसाचे धूमशान सुरू आहे. मे महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात यंदा प्रथमच सलग पाऊस आहे. पुढे मान्सून लवकर धडकणार आहे. त्यातच मान्सूनपूर्व पावसाने धडाका सुरू ठेवल्याने शेतकरी धास्तावला आहे. वादळी वा-यासह आलेल्या पावसामुळे एक तर उन्हाळी पिके, फळझाडांची हानी झाली आहे. दुसरीकडे शेतीची कामे खोळंबली आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे.
आधीच अवकाळी पावसाचे जोरदार धडाका आणि आता यंदा लवकरच मान्सूनही सक्रीय झाला आहे. त्यामुळे यावेळी लवकर मान्सून धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे या आठवड्यात पाऊस धो धो बरसणार आहे. या आठवड्यात केरळ, कर्नाटक, गोवा, कोकणासह गुजरातपर्यंत पाऊस धो धो बरसणार आहे. अनेक भागांत मुसळधार आणि अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन चक्री वादळ तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळेदेखील राज्यात तुफान पावसाची शक्यता आहे.
आज सकाळी साडेआठ वाजताच्या निरीक्षणानुसार दक्षिण कोकण गोवा किनारपट्टीच्या जवळ पूर्व मध्य अरबी समुद्रात जे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले. ते येत्या ३६ तासात अधिक तीव्र होईल. त्यामुळे त्याचे रुपांतर शक्ती या चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे. त्याची पुढची आगे कूच हे उत्तरेकडे असेल. चक्रीवादळाच्या अनुषंगाने महाराष्ट्रातील संपूर्ण कोकण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट दिला आहे. यावेळी वाऱ्याचा वेग हा ३५ ते ४० किलोमीटर प्रतितास इतका असू शकतो तर काही ठिकाणी तो ताशी ६० किलोमीटर इतका सुद्धा वेग असू शकतो. या दरम्यान पुढील दोन ते चार दिवस मच्छीमारांनी गुजरात ते महाराष्ट्र या किनारपट्टीवर मासेमारी करता जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.
मागच्या आठ ते दहा दिवसांपासून राज्यात पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. सर्वच भागात वादळी वा-यासह पावसाने जोरदार हजेरी लावल्याने उन्हाळी पिके, भाजीपाला, फळझाडांची प्रचंड हानी झाली आहे. मान्सूनपूर्व पावसाचा जोरात धडाका सुरू असल्याने नदी, नाल्यांना पूर येण्याची स्थिती निर्माण झाली आहे. शेतीची कामे तशीच अर्धवट आहेत. शेतकरी शेतीच्या कामाला लागण्याअगोदर पावसाने हजेरी लावल्याने शेतीची कामे जागेवरच आहे. त्यामुळे मान्सून येण्याअगोदर उन्हाळी कामे कशी होणार, याची चिंता आता शेतक-यांना भेडसावत आहे. मान्सूनपूर्व पाऊस आणि ४ ते ५ दिवस राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे.