पुणे : प्रतिनिधी
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र मुंबई आयोजित पत्रकारांच्या मुला-मुलींच्या उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने स्थापन झालेल्या प्रतिबिंब प्रतिष्ठानचा लोकार्पण सोहळा आणि पत्रकारिता आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांचा महाराष्ट्र महागौरव पुरस्कार वितरण सोहळा २०२५ रविवार दि. २५ मे रोजी पुणे येथील जे डब्ल्यू मेरियट या पंचतारांकित हॉटेल येथे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे, एबीपी माझाच्या संपादिका सरिता कौशिक, मंत्रालय पत्रकार संघटनेचे दिलीप सपाटे, डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र आणि प्रतिबिंब प्रतिष्ठान, मुंबईचे संस्थापक अध्यक्ष राज माने यांच्या उपस्थितीत पार पडला.
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष राजा माने यांनी प्रारंभी प्रास्ताविकात प्रतिबिंब प्रतिष्ठान काढण्यामागील उद्देश सांगितला. प्रतिबिंब प्रतिष्ठान हे गरजू पत्रकारांच्या मुला-मुलींच्या भवितव्यासाठी काम करणार असून, या माध्यमातून पत्रकारांच्या मुला-मुलींसाठी प्रामाणिकपणे काम करेल. राज्यातील डिजिटल पत्रकारांना दिशा मिळण्यासाठी डिजिटल मीडिया पॉलिसी जाहीर झाली पाहिजे, अशी मागणीही राजा माने यांनी केली. हा कार्यक्रम एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये कशाला, असे मला मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी म्हटले होते, याची आठवण सांगत राजा माने यांनी दादा, आम्ही माणसे साधी आहोत, परंतु काम टॉपचेच करतो, असे सांगत आपल्या धडाडीच्या कार्याची चुणूक दाखवून दिली. या कार्यक्रमाला डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे राज्यातील प्रतिनिधी, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमात पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागात शिक्षण क्षेत्रात मोलाचे काम करणा-या प्राचार्य डॉ. किरण सावे, तृतीयपंथीय, देहविक्रय क्षेत्रातील महिलांसाठी अनोेखे कार्य करणारे बार्शी येथील सचिन वायकुळे, शिक्षण आणि ग्रामविकास क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करणारे कंधार येथील प्रा. डॉ. पुरुषोत्तम धोंडगे, कला व मनोरंजन क्षेत्रात (बिग हिट मीडिया) वेगळी ओळख निर्माण करणारे अनुष्का सोलवट, ऋतिक मणी, अनिल मणी, बांधकाम आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत महाबळेश्वरचे युवा उद्योजक प्रशांत मोरे, सामाजिक कार्यात वेगळी ओळख निर्माण करणारे जामखेडचे (अहिल्यानगर) संजय कोठारी, साखर उद्योग क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण करणारे छ. संभाजीनगरचे उद्योजक नामदेवराव खराडे, चिक्की उद्योग क्षेत्रात स्वतंत्र मार्ग चोखाळणारे पाचगणी (जि. सातारा) येथील स्वप्नील परदेशी, आई प्रतिष्ठानच्या माध्यमातून महिला सबलीकरण व समाजसेवा क्षेत्रात कार्य करणारे सोलापूरचे मोहन डांगरे आणि सृष्टी डांगरे, शिक्षण, क्रीडा व साहित्य चळवळीत स्वतंत्र ओळख निर्माण करणारे छ. संभाजीनगर येथील विजय राऊत, प्रगत व सेंद्रीय शेती क्षेत्रात आपली ओळख वाढविणारे बीडचे शिवराम घोडके, संभव फाऊंडेशनच्या माध्यमातून सोलापूर येथे बेवारस, मनोरुग्ण पुनर्वसन क्षेत्रात कार्य करणारे आतिश सिरसाट, सहकारी साखर कारखाना व्यवस्थापन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे मानसिंग चव्हाण, नंददीप बेघर मनोरुग्ण निवारा केंद्राच्या माध्यमातून मनोरुग्ण पुनर्वसन क्षेत्रात कार्य करणारे संदीप व सौ. नंदिनी शिंदे, मातृभूमी प्रतिष्ठानच्या माध्यमातून ग्रामविकास आणि समाजसेवेचा जिथे कमी, तिथे आम्ही अशा नव्या पॅटर्नचे जनक बार्शीचे संतोष ठोंबरे, गडचिरोली, चंद्रपूर विभागात निराधारांचे पुनर्वसन करणारे दिव्यवंदना आधार फाऊंडेशन, चिमूर, जि. चंद्रपूरचे शुभम पसारकर आणि रोजंदारीवरील कामगार ते साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अशी यशस्वी झेप घेऊन शून्यातून विश्वनिर्मिती करणारे भास्कर घुले आदींचा मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्र महागौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यासोबतच पत्रकारिता क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणारे ज्येष्ठ पत्रकार संजीव उन्हाळे, छ. संभाजीनगर, एबीपी माझा मुंबईच्या संपादिका सरिता कौशिक, कोल्हापूरचे ज्येष्ठ पत्रकार भारत चव्हाण आणि मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघ, मुंबईचे अध्यक्ष दिलीप सपाटे यांचा महागौरव पत्रकारिता पुरस्कार आणि लोकमत डिजिटलच्या अश्विनी जाधव-केदारी, मटा डिजिटलचे अभिजित दराडे, लेटस्अप डिजिटलचे विष्णू सानप, मुंबई तक डिजिटलचे ओमकार वाबळे, पोलिसनामाचे नितीन पाटील यांचा डिजिटल स्टार पत्रकारिता महागौरव पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.