अहमदाबाद : वृत्तसंस्था
आयपीएलच्या थरारक अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्जचा ६ धावांनी पराभव करत १८ वर्षांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम दिला आणि पहिल्यांदाच आयपीएल ट्रॉफीवर आपले नाव कोरले. आयपीएलच्या झगमगत्या दुनियेत अनेक खेळाडू आले आणि गेले. पण याच विराट कोहलीला आणि आरसीबीला आयपीएलची ट्रॉफी जिंकण्यासाठी १८ वर्षांचा काळ लागला. त्यामुळे विराट कोहली भावनिक झाला आणि त्याला आनंदाश्रू रोखता आले नाहीत. आरसीबी संघ जिंकण्याच्या टप्प्यात आला, तेव्हापासूनच त्याच्या डोळ््यात अश्रू तरळायला लागले होते. यावेळी चेन्नई संघाचाही गौरव करण्यात आला. त्यांना २०२५ चा फेअर प्ले अॅवॉर्ड मिळाला.
अहमदाबादच्या स्टेडियमवर आरसीबीने पंजाबला हरवून अंतिम सामना जिंकला, तेव्हा विराटच्या अश्रूंचा बांध फुटला. एकीकडे आरसीबीचा हा ऐतिहासिक विजय साजरा होत असताना दुसरीकडे एक ट्रॉफी मात्र चेन्नई सुपर किंग्सच्या नावावर गेली. आयपीएल २०२५ चा फेअर प्ले अवॉर्ड चेन्नई सुपर किंग्सने जिंकला. चेन्नई संघाने अंतिम फेरी गाठली नाही, तरीही मैदानावरील शिस्त आणि प्रामाणिक खेळ याबाबत चेन्नईने बाजी मारली.
चेन्नई सुपर किंग्सला या सन्मानासोबत आयपीएलकडून १० लाख रुपयांचे रोख पारितोषिक आणि ट्रॉफीदेखील प्रदान करण्यात आली. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने नेहमीच आदर्श खेळाची पातळी जपली आहे. प्लेऑफमध्ये स्थान न मिळवतादेखील त्यांनी मैदानावरील आचारसंहिता, इतर संघांविषयी आदर आणि वेळेचे काटेकोर पालन यामुळे हा पुरस्कार पटकावला.
बक्षिसांचा वर्षाव
विजेता संघ : आरसीबी २० कोटी
उपविजेता : पंजाब किंग्ज संघ १२.५ कोटी
तिसऱ्या स्थानी राहिलेला संघ : मुंबई इंडियन् ७ कोटी
चौथ्या स्थानी राहिलेला संघ : गुजरात टायटन्स ६ कोटी
अंतिम सामना स्ट्रायकर ऑफ द मॅच : जितेश शर्मा १ लाख
अंतिम फेरीतील सामनावीर : कृणाल पांड्या ५ लाख रुपये
उदयोन्मुख खेळाडू : साई सुदर्शन १० लाख रुपये आणि ट्रॉफी
पर्पल कॅप (सर्वाधिक विकेट्स) : प्रसिद्ध कृष्णा (२५ विकेट्स) १० लाख रुपये आणि पर्पल कॅप
ऑरेंज कॅप : साई सुदर्शन (गुजरात टायटन्स, ७५९ धावा) १० लाख रुपये आणि पर्पल कॅप
फँटसी किंग ऑफ द सीझन : साई सुदर्शन १० लाख रुपये आणि ट्रॉफी
मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर (एमव्हीपी) : सूर्यकुमार यादव १५ लाख रुपये आणि ट्रॉफी
फेअरप्ले पुरस्कार : चेन्नई सुपर किंग्ज १० लाख रुपये आणि ट्रॉफी
सुपर सिक्स ऑफ द सीझन : निकोलस पूरन (४० षटकार) १० लाख
ग्रीन डॉट बॉल ऑफ द सीझन : मोहम्मद सिराज १० लाख
कॅच ऑफ द सीझन : कामिंदू मेंडिस १० लाख
सुपर स्ट्रायकर वैभव सूर्यवंशी (राजस्थान रॉयल्स) : १० लाख
फोर ऑफ द सीझन साई सुदर्शन (गुजरात टायटन्स) : १० लाख
खेळपट्टी आणि मैदान : दिल्ली कॅपिटल्स होम ग्राउंड ५० लाख