मुंबई : प्रतिनिधी
राज्याच्या सार्वजनिक वाहतुकीचे आधुनिकीकरण करण्यासाठी, इंधनावरील खर्च कमी करण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने राज्य परिवहन (एसटी) महामंडळात विद्युत बस दाखल केल्या जाणार आहेत. ईव्ही ट्रान्स प्रायव्हेट लि. कंपनीद्वारे विद्युत बसचा पुरवठा करण्यास नवीन सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार पुढील २ वर्षांत ५ हजार विद्युत एसटी बस एसटीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. त्यामुळे ग्रामीण, शहरी आणि निमशहरी भागाला विद्युत एसटी बसने जोडले जाणार आहे.
एसटी महामंडळाच्या अनेक आगारातील बस नादुरुस्त आहेत. त्या नादुरुस्त बस रस्त्यावर धावत असल्याने प्रवाशांची गैरसोय होते. त्यामुळे राज्यात नव्या को-या विद्युत बस खरेदी करण्यावर भर दिला जात आहे. एसटी महामंडळाने ५,१५० वातानुकूलित विद्युत बस घेण्याचा निर्णय घेतला होता. परंतु मार्च २०२४ ते जानेवारी २०२५ या कालावधीत ईव्ही ट्रान्स प्रायव्हेट लिमिटेड या पुरवठादार कंपनीकडून एसटीला नऊ मीटर लांबीच्या १३८ व १२ मीटर लांबीच्या ८२ अशा एकूण २२० बस पुरविण्यात आल्या.
अपेक्षित बस ताफ्यात दाखल न झाल्याने ईव्ही ट्रान्स प्रायव्हेट लिमिटेड या पुरवठादार कंपनीला इशारा पत्र देण्यात आले, तर करार रद्द करण्यात येणार होता. परंतु कंपनीला सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. सुधारित पुरवठा वेळापत्रकानुसार आता २०२५ वर्षाच्या अखेरीस टप्प्याटप्प्याने ६२० बस, २०२६ वर्षात २१०० बस आणि २०२७ पर्यंत उर्वरित बसचा पुरवठा केला जाईल.
ग्रामीण भागात गारेगार प्रवास
एसटी महामंडळाकडून खरेदी केल्या जाणा-या इलेक्ट्रिक बसमध्ये एसी असणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचा प्रवास गारेगार होणार आहे. त्याचबरोबर या बस इलेक्ट्रिक असल्याने यासाठी लागणा-या इंधनाचा खर्चही कमी होणार आहे. तसेच इलेक्ट्रिक बसमुळे पर्यावरणाची हानी टळणार आहे.