ठाणे, पुण्याचा समावेश, आता निवडणूक हालचालींना वेग
मुंबईत एकसदस्यीय
प्रभागरचना कायम
मुंबई : प्रतिनिधी
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठीच्या हालचालींना वेग आला असून त्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्याच पार्श्वभूमीवर महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींना प्रभाग रचना करण्याचे आदेश राज्य सरकाने दिले. अ, ब आणि क वर्ग महानगरपालिकांची प्रभाग रचना करण्याबाबतचे आदेश जारी करण्यात आले असून, यामध्ये पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, पिंपरी चिंचवड, नवी मुंबई, वसई विरार, छत्रपती संभाजीनगर आणि कल्याण डोंबिवलीसारख्या महापालिकांचा समावेश आहे.
राज्यात गेल्या तीन ते चार वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. त्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर आता त्यासंबंधी हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. या निवडणुकीसाठी प्रभाग रचना करण्यासंदर्भात राज्य सरकारने आदेश दिले. राज्यात ज्या ठिकाणी महापालिका निवडणुका घेण्यात येणार आहेत, त्या ठिकाणी आता प्रभाग रचनेचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामध्ये प्रभागांची रचना कशी करायची आणि लोकसंख्येचे काय निकष लावायचे, याचे स्पष्ट निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत.
मुंबईमध्ये आधी २२७ प्रभाग होते. महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर त्यामध्ये वाढ होऊन २३६ प्रभाग करण्यात आले होते. पुन्हा महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर २२७ प्रभाग करण्यात आले. त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. पण ती याचिका फेटाळण्यात आली. त्यामुळे मुंबईमध्ये २२७ प्रभाग कायम असणार आहेत.