गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासह २४१ प्रवासी, २४ विद्यार्थ्यांचा मृत्यू
अहमदाबाद : वृत्तसंस्था
अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एअर इंडियाचे विमान एक वाजून ३९ मिनिटांनी लंडनला जाण्यासाठी टेक ऑफ झाले. रनवेपासून थोड्या अंतरावर बीजे मेडिकल कॉलेजचे वसतीगृह आहे. विमानतळ उड्डाणानंतर पायलट समीर सभरवाल यांनी मेडे अर्थात इमर्जन्सी कॉल दिला आणि अवघ्या काही मिनिटांत विमान मेडिकल कॉलेजच्या वसतीगृहावर कोसळले. गुरुवार, दि. १२ जून २०२५ रोजी ही भीषण दुर्घटना घडली. या विमान अपघातात पायलट, क्रू मेंबर्ससह २४२ प्रवाशांपैकी २४१ प्रवासी आणि हॉस्टेलमधील वैद्यकीय महाविद्यालयाचे २४ भावी डॉक्टर अशा एकूण २६५ जणांचा बळी गेला. त्यामुळे संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली आणि अपघातात एकमेव बचावलेल्या जखमीची रुग्णालयात जाऊन भेट घेत विचारपूस केली. या दुर्घटनेमुळे संपूर्ण जग हळहळले.
एअर इंडियाच्या विमानाने अहमदाबाद येथून टेक ऑफ करताच अवघ्या ५ मिनिटांत हे विमान नजीकच्या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या हॉस्टेलच्या इमारतीला जाऊन धडकले. त्यानंतर मोठा स्फोट होऊन आगीचे लोळ सर्वत्र पसरले. त्यामुळे तेथील इमारतीसह परिसर आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला. विमान कोसळले तेव्हा वसतीगृहात मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी दुपारचे जेवण जेवत होते. या फोटोत दुर्घटनेमुळे अस्ताव्यस्त झालेल्या जेवण्याच्या प्लेट्स आणि इमारतीचे दृश्य दिसत आहे. विमानाचे जे चाक लँडिंग वेळी वापरले जात ते भिंत तोडून इमारतीत शिरेले. विमानाचा एक भाग हॉस्टेलच्या इमारतीला धडकून लटकला होता. दुर्घटनेवेळी हॉस्टेलमधील मुले जेवत होती. अचानक मोठे विमान धडकून झालेल्या मोठ्या स्फोटाने संपूर्ण इमारतीत आगीचे लोट उठले. फक्त हॉस्टेलच नाही तर हॉस्टेलबाहेर उभी असलेली वाहनेही जळून खाक झाली.
या विमानात २ पायलट आणि १० क्रू मेंबर्ससह २४२ प्रवासी या विमानात होते. २४२ पैकी भारतीय १६९, ब्रिटिश ५३, पोर्तुगीज ७ आणि एक कॅनडाचा नागरिक असल्याची माहिती आहे. २४२ प्रवाशांमध्ये विमानात दोन बालकांचाही समावेश होता. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणीही होते. ते आपल्या लेकीला भेटण्यासाठी लंडनला जात होते. त्यावेळी ८२५ फूट उंचीवरून मेघाणीनगरच्या रहिवासी परिसरात एका इमारतीवर हे विमान कोसळले. विमान कोसळताच मोठा स्फोट झाला आणि आगीचा लोट हवेत उसळला. दरम्यान या अपघातात मेडिकलच्या २४ विद्यार्थ्यांच्या मृत्यूची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
फॉरेन्सिक टीम घटनास्थळी
अहमदाबादमध्ये एअर इंडिया एआय-१७१ विमान अपघाताच्या ठिकाणी फॉरेन्सिक टीम पोहोचली आहे. अपघाताचे कारण शोधण्यासाठी टीम ढिगाऱ्यांची तपासणी करणार आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी अनेक केंद्रीय एजन्सी सक्रिय आहेत.
मृतदेहांचा डीएनए तपासणार,
मगच नातेवाईकांना ताबा
विमान अपघातातील मृतदेहांची ओळख पटवण्यात अडचण येत आहे. त्यामुळे सर्व मृतदेहांच्या डीएनए चाचण्या होणार आहेत. मृतांचे नातेवाईक आणि मृत्यू झालेल्या लोकांच्या मृतदेहांचे डीएनए तपासणार आहेत. विमान अपघातावेळी झालेल्या ब्लास्टमुळे मृतदेह ओळख न पटण्याच्या पलीकडच्या अवस्थेत आहेत. काही मृतदेहांवर सध्या शवविच्छेदन केले जात आहे तर दुसरीकडे डीएनए चाचण्या होणार आहेत. आतापर्यंत १९२ नातेवाईकांचे डीएनए चाचण्यांसाठी नमुने घेण्यात आले. अजूनही डीएनए चाचण्यांसाठी नमुने घेण्याचे काम सुरू आहे. तर अजूनही काही नातेवाईक रुग्णालयात पोहोचत आहेत.
पंतप्रधान घटनास्थळी
अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी घटनास्थळी दाखल झाले. पायी चालत संपूर्ण परिसराची पाहणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत इतर मंत्री आणि अधिकारी देखील उपस्थित आहेत. पंतप्रधान अहमदाबादमधील सिव्हील हॉस्पिटलमध्येही दाखल झाले. त्या ठिकाणी दाखल जखमींची चौकशी केली. तसेच गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या परिवाराची भेट घेऊन त्यांचे सांत्वनही केले.
वाचलेल्या एकमेव
प्रवाशाची भेट घेतली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपघातातून वाचलेल्या विश्वास कुमार यांची भेट घेतली. तसेच माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या कुटुंबियांचेही सांत्वन केले.