निधी वाटपावरून शिंदे गटाच्या नेत्यांत नाराजी, अजित पवार यांच्याशी चर्चा
मुंबई : प्रतिनिधी
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (२४ जून) मंत्रालय, मुंबई येथे राज्य मंत्रिमंडळ बैठक संपन्न झाली. कॅबिनेट बैठकीनंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीत नाट्यमय बैठकांचं सत्र पाहायला मिळाले. एकनाथ शिंदेंची शिवसेना मंत्र्यांबरोबर बैठक झाल्यानंतर मंत्री उदय सामंतांकडून अजित पवारांची भेट घेण्यात आली. त्यानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे या दोन उपमुख्यमंत्र्यांचीही भेट घडून आल्याचे बघायला मिळाले. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांच्या निधी वाटपावर वॉच ठेवण्याचे आदेश शिवसेनेच्या मंत्र्यांना दिल्याचे समजते. दरम्यान, अजित पवार यांनी अर्थ मंत्रालयाच्या निधी वाटपावर नजर ठेवण्याचा सर्वांना अधिकार असल्याचे समजते.
आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरे जाण्यापूर्वी निधी वाटपाचा घोळ संपावा, याकरता उदय सामंतांनी पुढाकार घेत बैठकीत आपल्या पक्षाची बाजू मांडली असल्याचे बोलले जात आहे. त्यातच निधी वाटपबाबत शिवसेना मंत्र्यांची नाराजी पाहता अर्थमंत्री अजित पवारांपर्यंत शिवसेनेची भूमिका पोहोचवून तोडगा काढण्याची जबाबदारी उदय सामंतावर टाकण्यात आली आहे. त्यामुळे आता त्यांच्या शिष्टाईची महायुतीतील समन्वय राखण्यास कशी मदत होते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
निधीवाटपात शिवसेना मंत्र्यांना सापत्न वागणूक दिली जात असल्याच्या नाराजीवर तोडगा काढण्यासाठी शिवसेनेकडून तातडीची पावले उचलली जात आहेत. त्यामुळेच निधी वाटपबाबत शिवसेना मंत्र्यांची नाराजी पाहता अर्थमंत्री अजित पवारांपर्यंत शिवसेनेची भूमिका पोहोचवून तोडगा काढण्याची जबाबदारी उदय सामंत यांना देण्यात आली. सोबतच आगामी निवडणूकीत मतदारांसमोर जाताना पुरेसा निधी आणि विकासकामे गरजेची आहेत. याकरता अर्थमंत्री अजित पवार आणि शिवसेना मंत्र्यांमध्ये समन्वय असणे गरजेचे असल्याची चर्चा आहे.
निधी वाटपाच्या वादात उदय सामंतांची मध्यस्थी
निधी वाटप करताना कोणत्या कामासाठी किती निधी दिला जावा, यात शिवसेनेत पक्षीय पातळीवरही समन्वय राखला जावा, निधीवाटपात सूसुत्रता यावी, याकरता अर्थमंत्री अजित पवार आणि शिवसेना मंत्र्यांमध्ये संवादाचा पूल म्हणून उदय सामंत काम करताना दिसत आहेत. त्यामुळे सामंत यांच्याकरवी निधीवाटपाबाबत समाधानकारक तोडगा निघेल, अशी अपेक्षा शिवसेना नेत्यांना आहे.