अंगावरचे कपडे, पायातील चप्पल सरकारमुळेच, लोणीकरांचे वादग्रस्त विधान
जालना : प्रतिनिधी
भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांची जीभ पुन्हा एकदा घसरली असून सोशल मीडियावर सरकार आणि आपल्या विरोधात लिहिणा-या तरुणांवर त्यांनी भाषणातून आगपाखड केली. कुचरवट्यावर बसलेली काही रिकामटेकडी कार्टी सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अंधभक्त असल्याचे लिहितात. पण या कार्ट्यांच्या माईचा पगार आणि बापाचे पेन्शन लोणीकर यांनीच केले. एवढेच नव्हे तर तुझ्या बापाला पेरणीला ६ हजार रुपये नरेंद्र मोदींनी दिले, असे वादग्रस्त विधान माजी मंत्री आमदार लोणीकर यांनी केले.
जालना जिल्ह्यातील परतूर येथे सोलार योजनेच्या शुभारंभ प्रसंगी लोणीकर बोलत होते. यावेळी लोणीकर यांनी तुझ्या अंगावरचे कपडे, आणि पायातील बूट चप्पलसुद्धा सरकारमुळेच असल्याचे विधान केल्याने लोणीकर यांच्या वक्तव्यावर टीका होत आहे. २ दिवसांपूर्वी लोणीकर यांनी थेट मतदारांना इशारा देणारे वक्तव्य केले होते. जालना तालुक्यातील बोरगावमध्ये लोणीकर यांच्या हस्ते मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या ८ कोटीच्या सिमेंट काँक्रीट रस्त्याचे उद्घाटन झाले. त्यावेळी भाषणात गावातून विधानसभेत लीड नसल्याने नाराज बबनराव लोणीकर यांनी बोरगाव ग्रामस्थांना ५ वर्षाचे बलुते, एक फुली द्या नाही तर नका देऊ. तुम्ही मला नाही दिले तर ५-१० कोटी मिळतील हे डोक्यातून काढून टाका. मी एक-दोन तीन वेळा पाहिल, नंतर गावावर फुली मारील, असे वादग्रस्त विधान केले होते.