जागतिक फॅशन आयकॉन बनली कोल्हापुरी चप्पल
कोल्हापूर : प्रतिनिधी
अलिकडेच सोशल मीडियावर एका कोल्हापुरी चप्पलचा फोटो व्हायरल झाला आहे, ज्याची किंमत १ लाख रुपयांपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जात आहे. आता ही चप्पल इतकी महाग कशी असू शकते, असा अनेकांना प्रश्न पडला असेल. परंतु ती फक्त पादत्राणे नाहीत तर भारतीय हस्तकला आणि परंपरेचे प्रतीक आहे.
पूर्वी ही चप्पल सामान्य लोकांसाठी होती. पण आज मोठ्या फॅशन ब्रँड आणि डिझायनर्सनी त्यांच्या कलेक्शनमध्ये त्यांचा समावेश केला आहे. परदेशी ब्रँड प्राडाने ही चप्पल लाँच केली आहे, ज्याची किंमत १ लाख २० हजार रुपये असल्याचे सांगितले जाते. कोल्हापुरी चप्पल महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्याची ओळख आहे. तसेच ही कोल्हापुरी चप्पल १३ व्या शतकातापासून वापरतात असे मानले जाते. पूर्वी ही चप्पल मराठा योद्धे आणि ग्रामीण समुदाय वापरत असत. त्यांची रचना अशी होती की त्यामुळे उन्हाळ्यात पाय थंड राहत असत आणि पावसात टिकाऊ राहत असत.
कोल्हापुरी चप्पलची वैशिष्ट्ये
कोल्हापुरी चप्पलची खास गोष्ट म्हणजे ती पूर्णपणे हाताने बनवली जाते. चप्पलची जोडी तयार करण्यासाठी २ ते ४ दिवस लागू शकतात. शिवण्यापासून ते डिझाइनपर्यंत, सर्व काही कारागीर त्यांच्या स्वतःच्या हातांनी करतात. यामध्ये कोणत्याही मशीनचा वापर केला जात नाही. म्हणून, प्रत्येक जोडी पूर्णपणे अद्वितीय आहे. कोल्हापुरी चप्पल केवळ सुंदर आणि पारंपारिकच नाहीत तर पर्यावरणासाठीदेखील चांगल्या आहेत. त्या पूर्णपणे पर्यावरणपूरक प्रक्रियेद्वारे बनवल्या जातात, ज्यामुळे जास्त कचरा पसरत नाही किंवा हवामानावर वाईट परिणाम होत नाही.
कोल्हापुरी चप्पल कशा बनवल्या जातात?
कोल्हापुरी चप्पल एका खास प्रकारच्या अस्सल लेदरपासून बनवली जाते, जे अत्यंत टिकाऊ आणि आरामदायी असते. यासाठी लेदर प्रथम पाण्यात आणि नैसर्गिक तेलात तासंतास भिजवून मऊ केले जाते. नंतर ते हाताने डिझाइन करून नंतर शिवणकाम केले जाते. त्यात कोणतेही कृत्रिम किंवा रासायनिक घटक वापरलेले नाहीत.
ही कोल्हापुरी चप्पल फॅशन स्टेटमेंट कसे बनले?
गेल्या काही वर्षांत देशातील मोठ्या फॅशन डिझायनर्सनी त्यांच्या कलेक्शनमध्ये कोल्हापुरी चप्पलचा समावेश केला आहे. बॉलिवूड सेलिब्रिटींपासून ते परदेशी मॉडेल्सपर्यंत, ही कोल्हापुरी चप्पल स्टायलिश पोशाखांसोबत घालताना दिसतात. विशेषतः परदेशात हँडक्राफ्टेड इंडियन फुटवेअरची मागणी झपाट्याने वाढली आहे. अशातच इटलीच्या लक्झरी ब्रँड प्राडाने नुकतेच त्यांच्या स्प्रिंग समर २०२६ फॅशन शोमध्ये रॅम्पवरील मॉडेल्सच्या पायात कोल्हापुरी चप्पल दिसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आणि सोशल मीडियावर हीच चर्चा सुरू झाली. प्राडाने या कोल्हापूरी चप्पलेची किंमत १ लाख २० हजार रुपये लावली होती.