उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती
मुंबई : प्रथम वर्ष पदविका (पॉलीटेक्निक) अभियांत्रिकी अभ्यासक्रमांकरिता केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेतून प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना अंतिम संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. उमेदवारांना २ जुलै ते ४ जुलै २०२५ या कालावधीत ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहेत, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.
या प्रवेश प्रक्रियेसाठी पूर्वी ३० जून २०२५ ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली होती. या कालावधीत एकूण १ लाख ५८
हजार ८७६ उमेदवारांनी नोंदणी केली असून, त्यापैकी १लाख ३८ हजार २९८ विद्यार्थ्यांनी अर्जाची अंतिम प्रक्रिया पूर्ण करून शुल्क भरले आहे. विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात मिळालेल्या प्रतिसादामुळे आणि अनेक विद्यार्थ्यांच्या मागणीवरून प्रवेशासाठी आणखी एक अंतिम संधी देण्यात येत आहे.
या अंतिम टप्प्यात अर्ज सादर करून ४ जुलै २०२५ पर्यंत अर्ज निश्चित करणाऱ्या उमेदवारांचा अंतिम गुणवत्ता यादीमध्ये समावेश केला जाणार आहे.
विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करताना आवश्यक त्या कागदपत्रांची माहिती, सविस्तर वेळापत्रक आणि प्रवेश प्रक्रियेचा तपशील पाहण्यासाठी https://dte.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहनही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील यांनी आले आहे.
00000