पोलिसांची प्राथमिक चौकशी, खुद्द सरकारी वकिलानेच केला खुलासा
मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्र सरकारच्या वकिलांनी दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात कोणतीही संशयास्पद माहिती नाही. हे आत्महत्येचे प्रकरण आहे, असे मुंबई हायकोर्टात स्पष्ट केले. त्यामुळे यावरून तापलेल्या राजकारणाला आता वेगळे वळण लागले आहे. भाजप विशेषत: राणे कुटुंबीयांनी दिशा सालीयन प्रकरणावरून ठाकरे कुटुंबाला घेरण्याचा प्रयत्न केला. परंतु सरकारी वकिलांनी राज्य सरकारची बाजू मांडताना यात घातपात दिसत नसल्याचे म्हटले. एवढेच नव्हे, तर या प्रकरणाशी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचा संबंध नसल्याचेही स्पष्ट केले. त्यामुळे आदित्य ठाकरे यांना कोंडीत पकडण्याचा सत्ताधा-यांचा डाव फसला. दरम्यान, याच मुद्यावरून भाजप नेत्यांनी पुन्हा खोचकपणे टीका सुरू केली. परंतु आता केवळ राजकारणच अधिक होण्याची चिन्हे आहेत.
अभिनेता सुशांत सिंग राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनचे ९ जून २०२० रोजी मालाडमधील इमारतीच्या १२ व्या मजल्यावरून पडून निधन झाले. दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिसांच्या एसआयटी (विशेष तपास पथक) किंवा सीबीआयकडून करावी, अशी मागणी केली. यावर आता महाराष्ट्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयात सांगितले की, दिशा सालियन (२८) यांच्या मृत्यूमध्ये कोणत्याही प्रकारच्या संशयाला वाव नाही. तसेच आदित्य ठाकरेदेखील निर्दोष आहेत. यामुळे माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना घेरण्याचे प्रयत्न मुंबई मनपा निवडणुकीआधीच सपशेल फेल गेले आहेत. सत्ताधारी भाजपने दिशा सालियन प्रकरणावरून ठाकरे कुटुंबीयांना घेरण्याचा प्रयत्न केला होता. त्यासाठी एकवेळी आम्हाला कुठलीही चौकशी करायची नाही, असे म्हणणारे दिशा सालियनचे वडील आता सीबीआय चौकशीची मागणी करीत आहेत. त्यासाठी त्यांनी मुंबई हायकोर्टात याचिकाही दाखल केली आहे. परंतु सरकारी वकिलानेच हायकोर्टात घातपाताची शक्यता फेटाळून लावल्याने यामागे केवळ राजकारण असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.
दरम्यान, या प्रकरणावरून आता पुन्हा आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. भाजप आमदार राम कदम यांनी दिशा सालियन प्रकरणात माफी मागायची असेल तर तत्कालीन ठाकरे सरकारनं हात जोडून माफी मागावी. कारण पुरावे नष्ट करण्याचे काम केले गेले आहे. दिशा सालियन यांच्या वडिलांची त्यांनी माफी मागायला पाहिजे, असे म्हणत ठाकरेंना डिवचले.
दिशा सालियान प्रकरणात षडयंत्र रचत कोणाला वाचवायचे होते, हे जगाला माहिती आहे. वाझेसारखे प्यादे त्यांच्याकडे होते. उद्धव ठाकरेंसारखे मुख्यमंत्री होते. कोणाला वाचवायचे होतं? दिशा सालियनचे वडील खोटे असू शकत नाहीत. पुरावे नष्ट करण्याचे काम ठाकरेंच्या काळात झाले आहे. साधू हत्याकांड, सुशांतसिंह राजपूत प्रकरणात पुरावे नष्ट झाले आहेत. कोणालाही न्याय मिळाला नाही, असेही पुढे राम कदम म्हणाले. तसेच भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे माफी मागणार का, या प्रश्नावर राम कदम म्हणाले की, माफी मागायची असेल तर तत्कालीन ठाकरे सरकारने हात जोडून माफी मागावी. कारण पुरावे नष्ट करण्याचे काम केले गेले आहे. दिशा सालियानच्या वडिलांची माफी मागायला पाहिजे, असेही ते म्हणाले.
दिशा सॅलियन एक सेलिब्रिटी मॅनेजर होती. तिने वरुण शर्मा, सुशांतसिंग राजपूत, भारती सिंगसारख्या अनेक प्रसिद्ध कलाकारांसोबत काम केले. तिने ८ जून २०२० रोजी रात्री १२ व्या मजल्यावरून पडून आत्महत्या केल्याचे प्रकरण समोर आले. त्यानंतर या प्रकरणाचे राजकारण झाले. सत्ताधा-यांनी माजी ंत्री आदित्य ठाकरे यांचे नाव या प्रकरणात जोडून खळबळ उडवून दिली. त्यामुळे या प्रकरणाची चर्चा अधिक झाली. २०२२ मध्ये महाराष्ट्र विधानसभेतही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. शिवसेनेचे (शिंदे गटाचे) आमदार भरत गोगावले आणि भाजप आमदार नितेश राणे यांनी दिशा सालियनच्या मृत्यूचा मुद्दा उपस्थित केला आणि चौकशीची मागणी केली होती.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या जबाबानुसार दि. ८ जून २०२० च्या त्या रात्री दिशाच्या मालवणी येथील घरात तिच्या जवळच्या मित्रांसह एक पार्टी सुरू होती. मात्र अचानक तिथे आदित्य ठाकरे, त्यांचा एक अंगरक्षक, सूरज पांचोली, दिनो मौर्या ही मंडळी दाखल झाली आणि त्या पार्टीचा माहोलच बदलला. तिच्यावर अत्याचार झाल्याचाही आरोप केला गेला. त्यातूनच तिला संपविले गेल्याचा आरोप केला गेला. या घटनेनंतर अनेक राजकारणी आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी अचानक सक्रिय झाले होते. या घटनेनंतर आदित्य ठाकरे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी फोनवरून सतत संपर्कात होते. याशिवाय दिशाच्या जवळच्या काही व्यक्तींनाही त्यांनी अनेक फोनकॉल्स केले. दिशाच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी सुशांतसिंह राजपूत याचाही मृत्यू झाला. याच कालावधीत सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्तीसोबत आदित्य ठाकरेंनी ४४ वेळा फोनवर बोलणे केल्याचाही आरोप याचिकेत आहे. मात्र, यात आदित्य ठाकरे यांचा संबंध नसल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीतून पुढे आले आहे. तसेच सरकारी वकिलांनीदेखील ही आत्महत्याच असल्याचे म्हटले आहे.