बर्मिंगहम : वृत्तसंस्था
भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिलने बर्मिंगहॅम कसोटी सामन्यात इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या डावात दि. ३ जुलै २०२५ रोजी ऐतिहासिक कामगिरी केली. गिल इंग्लंडच्या भूमीवर कसोटी किक्रेटमध्ये द्विशतक झळकावणारा पहिला भारतीय कर्णधार ठरला. त्याचबरोबर कसोटीत भारतीय कर्णधार म्हणून द्विशतक झळकावणारा तो दुसरा सर्वांत तरुण फलंदाज ठरला असून, त्याने या विक्रमासह विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर यांनाही मागे टाकले.
शुभमन गिलने पहिल्या डावात इंग्लंडविरुद्ध आपले द्विशतक ३११ चेंडूत पूर्ण केले. यामध्ये २ षटकार आणि २१ चौकार लगावले. गिलच्या कसोटी कारकिर्दीतील हे पहिले द्विशतक ठरले आणि इंग्लंडच्या भूमीवरही पहिलेच द्विशतक ठरले. भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वांत कमी द्विशतक झळकावणारा तो दुसरा सर्वांत तरुण कर्णधार ठरला. या कामगिरीसह गिलने सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीलाही मागे टाकले. तेंडुलकरने कर्णधार म्हणून १९९९ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध द्विशतक झळकावले होते. तेव्हा त्याचे वय २६ वर्षे १८९ दिवस होते तर विराटने २१०६ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध ही कामगिरी केली होती. त्यावेळी त्याचे वय २७ वर्षे २६० दिवस होते तर गिलचे वय २५ वर्षे २९८ दिवस एवढे आहे. तो सर्वांत कमी वयात द्विशतक झळकावणारा दुसरा भारतीय कर्णधार ठरला.
भारतीय संघ १९३२ पासून इंग्लंडमध्ये कसोटी क्रिकेट खेळत आहे. पण गेल्या ९३ वर्षांच्या इतिहासात भारताच्या एकाही कर्णधाराला इंग्लंडमध्ये द्विशतक झळकावता आले नव्हते. यापूर्वी मोहम्मद अझरने इंग्लंडमध्ये १९९० साली खेळत असताना १७९ धावा केल्या होत्या. तो रेकॉर्ड आता गिलने मोडीत काढला आहे. त्यामुळे इंग्लंडमध्ये सर्वाधिक धावा करणारा तो कर्णधार ठरला. पण इंग्लंडमध्ये द्विशतक झळकावणारा तो पहिलाच भारताचा कर्णधार ठरला.
द्विशतक झळकावणारे
भारतीय कर्णधार
मन्सूर अली खान पतौडी, सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, शुभमन गिल हे कसोटीत द्विशतक झळकवणारे भारतीय कर्णधार आहेत. यात मन्सूर अली खान पतौडी यांनी सर्वांत कमी म्हणजेच २३ वर्षे ३९ दिवस एवढे वय असताना कसोटीत द्विशतक (१९६४) झळकावले तर गिलने वय २५ वर्षे २९८ दिवस एवढे आहे. त्यामुळे कमी वयात द्विशतक झळकावणारा तो दुसरा भारतीय कर्णधार ठरला.