परवानगी नाकारली, मनसे, शिवसेना पदाधिका-यांची धरपकड, कार्यकर्ते, पदाधिकारी आक्रमक
मुंबई : प्रतिनिधी
मिरा भाईंदरमध्ये मंगळवार, दि. ७ जुलै २०२५ रोजी काढण्यात आलेल्या मराठा मोर्चावरुन राजकारण चांगलेच तापताना दिसले. या मोर्चाला सुरुवातीला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मात्र, मराठी आंदोलकांचा आक्रमक पवित्रा पाहिल्यानंतर साधारण दोन-तीन तासांनी पोलिसांनी मोर्चाला अधिकृत परवानगी दिली नसली तरी आंदोलकांना बालाजी हॉटेल चौक ते मीरारोड रेल्वे स्थानकापर्यंत मोर्चा काढण्याची परवानगी दिली. त्यामुळे मीरा भाईंदरमधील हा मराठी मोर्चा काही प्रमाणात यशस्वी ठरला.
मराठी अस्मितेसाठी आयोजित हा मोर्चा यशस्वी होऊ नये, म्हणून कालपासून पोलिसांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु होती. पोलिसांनी मनसे, ठाकरे गट आणि मराठी एकीकरण समितीच्या अनेक कार्यकर्त्यांना प्रतिबंधात्मक नोटीस बजावल्या होत्या. मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांना पोलिसांनी मंगळवारी पहाटे साडेतीन वाजता ताब्यात घेतले होते. त्यांना सुरुवातीला काश्मिरा आणि नंतर पालघर येथील पोलीस ठाण्यात नेण्यात आले होते. अखेर दुपारी साडेबाराच्या सुमारास त्यांना सोडण्यात आले. यानंतर अविनाश जाधव यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
अविनाश जाधव यांनी मीरा भाईंदरमध्ये मराठी माणसाने दाखवलेल्या एकीबद्दल आनंद व्यक्त केला. मला ताब्यात घेण्यापेक्षा आजचा मोर्चा होणे महत्त्वाचे होते. आम्ही नसतानाही लोकं तिकडे रस्त्यावर उतरली होती. त्यांनी मराठीचा माज काय असतो, हे दाखवून दिले. ज्या लोकांनी या सगळ्या गोष्ट केल्या आहेत, त्यांना आम्ही सोडणार नाही. परंतु मला एका गोष्टीचा प्रचंड आनंद आहे की, आज मराठी माणूस एकजूट झाला. मला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मीरा भाईंदर, वसई आणि विरारमधील मनसे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली नसती आणि आमचे सगळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या मोर्चाला असते तर हा मोर्चा प्रचंड झाला असता. हा मोर्चा होणे खूप गरजेचे होते. महाराष्ट्राच्या विरोधात १०० -२०० लोक मोर्चा काढत असतील तर त्याला पाच-पंचवीस हजारांच्या गर्दीनेच उत्तर देणे गरजेचे होते. यापुढे कोणीही अशाप्रकारे महाराष्ट्र आणि मराठीविरोधात मोर्चा काढायची हिंमत करणार नाही, असे अविनाश जाधव यांनी म्हटले.