विमानाच्या ढिगा-याखाली सापडला मृतदेह
जयपूर : वृत्तसंस्था
राजस्थानमधील चुरू येथे आज वायूसेनेचे एक विमान कोसळल्याची घटना घडली आहे. हा अपघात बुधवार, दि. ९ जुलै २०२५ रोजी रतनगडमधील भानुदा गावामध्ये घडला. विमानाच्या ढिगाऱ्यामध्ये एक मृतदेह सापडला आहे. हा मृतदेह विमानाच्या पायलटचा असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वायुसेनेचे एक पथक घटनास्थळी रवाना झाले आहे.
राजस्थानातील रतनगडमधील भानुदा गावात हा भीषण अपघात घडला. भारतीय वायुसेनेचं विमान कोसळलं. स्थानिक लोकांनी या अपघाताची माहिती पोलिसांना दिली. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांची एक टीम अपघातस्थळी दाखल झाली, पोलिसांकडून तातडीने घटनास्थळी बचाव कार्याला सुरुवात झाली. मात्र, अद्याप तरी या विमानाच्या पायलट संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
२०० फूट परिसरात जळालेले अवशेष
चुरू जिल्ह्यातल्या रतनगढ तहसीलच्या बॉर्डरवर असलेल्या भानुदा गावात हा अपघात घडला आहे. वायूसेनेचे विमान कोसळले आहे. या अपघाताबाबत माहिती देताना स्थानिक नागरिकांनी सांगितलं की, आकाशातून एक जळत असलेले विमान खाली कोसळले. हा अपघात इतका भीषण होता की, या विमानाचा मलबा तब्बल दोनशे फूट परिसरात विखूरला गेला, विमानाचे पार्ट दूरवर उडाले.
दरम्यान आतापर्यंत घटनास्थळी एक मृतदेह आढळून आला आहे. मात्र, जेव्हा अपघात झाला तेव्हा विमानात नक्की किती लोकं होते, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. अपघाताच्या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने अपघातस्थळी गर्दी केली होती, या विमानामध्ये एक किंवा दोन लोक असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
दरम्यान यापूर्वी मार्च-एप्रिलमध्ये देखील अशाच दोन घटना घडल्या होत्या. त्यात दोन एप्रिलला गुजरातच्या जामनगर परिसरात भारतीय वायुसेनेचं जागवॉर प्लेन क्रॅश झाले होते. दोन एप्रिल रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास हा अपघात घडला होता. अपघात झाला तेव्हा या विमानात दोन पायलट होते, त्यातील एकाचा मृत्यू झाला तर एक थोडक्यात बचावला तर दुसरी घटना अंबालामध्ये घडली होती. अंबाला एअर बेसवरून या विमानाने उड्डाण केले होते. मात्र पंचकुलाच्या जवळपास या विमानाचा अपघात झाला.