लढाऊ विमान होणार आता अधिक घातक
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानकडून भारताचे राफेल विमान पाडल्याचा दावा केला जात आहे. पाकिस्तानचा हा दावा भारताने वारंवार फेटाळून लावला. तसेच पाकिस्तानकडूनही विमान पाडल्याचा एकही पुरावा दिला नाही. राफेल बनवणाऱ्या फ्रान्सच्या कंपनीनेही पाकिस्तानचा दावा चुकीचा असल्याचे म्हटले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पाकिस्तानची झोप उडवणारी बातमी आली आहे. भारताने आपल्या लढाऊ विमानांची सुरक्षा आणखी मजबूत करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताला इस्त्रायलकडून डेकॉय सिस्टम मिळवणार आहे. यामुळे राफेल विमानाची ताकद वाढणार असून शत्रूच्या भागामध्ये हे विमान सुरक्षित असणार आहे.
डेकॉय सिस्टम राफेल विमानांना शत्रूच्या क्षेपणास्त्रांपासून संरक्षण देईल. भारताने इस्त्रायलला एक्स गार्ड फायबर ऑप्टिक टोन्ड डेकॉय सिस्टमची ऑर्डर दिली आहे. ही प्रणाली राफेल विमानांची ताकद वाढवेल आणि शत्रूच्या क्षेत्रातही त्यांना सुरक्षित ठेवणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डेकॉय सिस्टम राफेल विमानांना लावून त्याची चाचणीही करण्यात आली आहे. भारत सरकार आता लवकरात लवकर ही प्रणाली मिळवण्याच्या तयारीला लागले आहे. ही प्रणाली राफेल विमानांना शत्रूंच्या क्षेपणास्त्रापासून वाचवणार आहे.
इस्त्रायलच्या हवाई दलाकडून डेकॉय सिस्टमचा वापर केला जातो. ही प्राणाली वारंवार वापरता येते. तिला लढाऊ विमानांच्या इलेक्ट्रॉनिक वारफेयर सिस्टमसोबत जोडलेले असते. ही प्रणाली शत्रूच्या क्षेपणास्त्राची फसवणूक करण्याचे काम करते. ही प्रणाली एका पॉडमध्ये लावलेली असते. मिशन दरम्यान त्याचा वापर केला जातो. फायबर ऑप्टिक लाइनच्या माध्यमातून ही प्रणाली विमानाला जोडलेली असते. जेव्हा शूत्र क्षेपणास्त्राने विमानावर हल्ला करतो, तेव्हा ही सिस्टीम त्याला आपल्याकडे ओढून घेते. क्षेपणास्त्र त्या सिस्टीमला विमान समजून हल्ला करतो. त्यामुळे विमानाला काहीच होत नाही.
ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवशी राफेल विमानांनी पाकिस्तानच्या ठिकाणांवर हल्ला केला होता. त्यानंतर पाकिस्तानकडून भारतावर हल्ला करण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानी हवाई तळांवर भारताने हल्ले केले. हे क्षेपणास्त्र हल्ले करण्यासाठीही भारताने राफेल विमानांचा वापर केला होता.