नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात २६ पर्यंटकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानदरम्यान मे महिन्यात संघर्ष झाला. या संघर्षात ब्राह्मोस क्षेपणास्त्राने महत्वाची भूमिका बजावली. या क्षेपणास्त्राच्या अचूक माऱ्यामुळे पाकिस्तानमधील दहशतवादी ९ तळ नष्ट झाली. त्यानंतर पाकिस्तानच्या लष्करी केंद्रांचे मोठे नुकसान झाले. ब्राह्मोस क्षेपणास्त्राचे हे यश संपूर्ण जगाने पाहिले. त्यामुळे ऑपरेशन सिंदूरनंतर १४-१५ देशांनी ब्राह्मोस क्षेपणास्त्र खरेदीसाठी आपला रस दाखवला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ही माहिती दिली.
नॅशनल पीजी कॉलेजमध्ये उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्र भानू गुप्ता यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. यावेळी राजनाथ सिंह बोलत होते. त्यांनी सांगितले की, ऑपरेशन सिंदूरमध्ये ब्राह्मोस क्षेपणास्त्राने महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळेच तेव्हापासून १४ ते १५ देशांनी ब्राह्मोस क्षेपणास्त्र खरेदीसाठी रस दाखवला आहे. हे सर्व देश ब्राह्मोस क्षेपणास्त्र खरेदी करू इच्छितात. संरक्षण क्षेत्राला आत्मनिर्भर बनवण्यासाठी ब्राह्मोस क्षेपणास्त्र महत्वाचे ठरणार आहे. यामुळे रोजगारही वाढणार आहे. आता लखनऊमधूनही ब्राह्मोसची निर्यात केली जाणार आहे.
ब्राह्मोस लष्करी आत्मविश्वासाचे प्रतीक
राजनाथ सिंह म्हणाले, ब्राह्मोस भारताच्या तंत्रज्ञान ताकदीचे आणि धोरणात्मक दृढनिश्चयाचे प्रतीक बनले आहे. ब्राह्मोस आता फक्त एक क्षेपणास्त्र राहिलेले नाही तर ते भारताच्या लष्करी आत्मविश्वासाचे प्रतीक बनले आहे. ऑपरेशन सिंदूरमधील ब्राह्मोसने केलेली कामगिरी पाहून जग आश्चर्यचकित झाले. भारत आता केवळ संरक्षण आयातदार नसून जागतिक संरक्षण निर्यातदार बनत आहे.