संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी संतप्त, विरोधक आक्रमक, विधानसभेत मांडला प्रश्न
अक्कलकोट : प्रतिनिधी
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोटमध्ये काळे फासण्यात आले आहे. प्रवीण गायकवाड हे संभाजी ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. ते अक्कलकोट येथे फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी आले असताना शिवधर्म फाउंडेशनच्या पदाधिका-यांनी त्यांच्या तोंडाला काळे फासले आणि अंगावर शाई, काळे वंगण टाकले. तसेच धक्काबुक्कीही केली. या मागे माझ्या हत्येचा कट होता. परंतु संभाजी ब्रिगेडच्या पदाधिका-यांमुळे मी जिवंत राहू शकलो, असे प्रवीण गायकवाड म्हणाले. या प्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना अटक केली आहे. या घटनेचा विरोधी पक्षांसह सामाजिक संघटनांनी निषेध नोंदविला. दरम्यान, सोमवारी विधानसभेत हा प्रश्न मांडण्यात आला. विरोधकांनी आक्रमकपणे हा विषय मांडला. कॉंग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी हा मुद्दा उपस्थित केला. याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले.
अक्कलकोट शहरातील कमलाराजे चौक येथील प्रियदर्शनी हॉल येथे फत्तेसिंह शिक्षण संस्था अक्कलकोट व सकल मराठा समाज अक्कलकोट यांच्या संयुक्त विद्यमाने जन्मेजयराजे भोसले यांचा नागरी सत्कार समारंभ आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी संभाजी ब्रिगेड सामाजिक संस्था पुण्याचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड व कार्यकर्ते गाडीतून उतरुन हॉलकडे पायी चालत जात असताना त्यांच्यावर काळे वंगण फासत हल्ला करण्यात आला. या घटनेत प्रवीण गायकवाड यांना मारहाण देखील करण्यात आली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. विशेष म्हणजे घटना घडल्यानंतर प्रवीण गायकवाड आपल्या गाडीत बसले होते. मात्र त्यानंतर त्यांना गाडीतून बाहेर काढून मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे.
संभाजी ब्रिगेड सामाजिक संस्था या नावाच्या पुढे श्री छत्रपती हे नाव लावावे, या कारणावरुन शिवधर्म फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक काटेसह त्यांच्या इतर ६ समर्थकांनी गैरकायद्याची मंडळी जमवून प्रवीण गायकवाड व फिर्यादीच्या अंगावर शाई, वंगण टाकून छत्रपती संभाजी महाराज की जय अशा घोषणा दिल्या. तसेच यावेळी सर्वांना धक्काबुक्की करून हाताने मारहाण केली. तसेच इनोव्हा गाडीच्या समोरच्या काचेवर दगड मारून नुकसान केले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, याचा सपोनि बागाव हे अधिक तपास करीत आहेत.
माझ्या हत्येचा कट होता
आपल्यावरील हल्ल्याला पूर्णपणे सरकार जबाबदार आहे. हा माझ्या हत्येचा कट होता आणि ही शेवटाची सुरुवात आहे. या सत्ताकाळात पुरोगामी विचारांचे कार्यकर्ते असुरक्षित आहेत, असे प्रवीण गायकवाड म्हणाले.