उपमुख्यमंत्र्यांचा मास्टरस्ट्रोक, आनंदराज आंबेडकरांची मिळाली साथ
मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मास्टर स्ट्रोक मारला. त्यांनी शिवशक्ती आणि भीमशक्तीची युती घडवून आणली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेसोबत युती केली. आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि आनंदराज आंबेडकर यांची रिपब्लिकन सेना एकत्र निवडणूक लढणार आहे. या प्रसंगी आनंदराज आंबेडकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेसोबत युती करण्याचा निर्णय का घेतला, असे सांगितले.
राज्यात ही युती आजची नाही, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे यांच्यापासून सुरु झालेली ही युती आहे. खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात राजकीय, सामाजिक परिवर्तन घडवण्यासाठी आम्ही दोन्ही कार्यकर्ते एकत्र आलो आहोत. मी मुद्दाम कार्यकर्ते बोललो. कारण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना कार्यकर्ता म्हणून प्रत्येक तळागाळातल्या व्यक्तीशी त्यांच्या सुखदु:खाशी एकरुप होण्याचा प्रयत्न केला, असे आनंदराज आंबेडकर म्हणाले.
म्हणून आम्ही दोघे एकत्र आलो
अशा कार्यकर्त्याबरोबर महाराष्ट्रातला प्रचंड मोठा आंबेडकरी समाज जो आतापर्यंत अनेक वर्ष रस्त्यावर लढाई लढत आला. त्या कार्यकर्त्याला आतापर्यंत काही मिळाले नाही. या कार्यकर्त्याला सध्याच्या होणाऱ्या स्थानिक इलेक्शनमध्ये आंबेडकरी कार्यकर्त्याला सत्तेचा लाभ मिळावा, यासाठी आम्ही दोघांनी एकत्र यायचे ठरवले, असे आनंदराज आंबडेकर म्हणाले.
आज आनंद वाटतो. मोठ्या संख्येने कार्यकर्ते आले आहेत. यामुळे महाराष्ट्रातील संपूर्ण सामाजिक, राजकीय जीवन ढवळून निघाल्याशिवाय राहणार नाही. एकप्रकारे काही जण म्हणतील त्यांचे विचार, आमचे विचार. या देशातला प्रत्येक जण बाबासाहेबांच्या घटनेवर चालतो. त्यामुळे त्यांचा आमचा विचार वेगळा असण्याचा प्रश्नच नाही, असे आनंदराज आंबेडकर यांनी सांगितले.
एकनाथराव काहीतरी वेगळे आहेत. सर्वांना घेऊन चालणारे आहेत. म्हणून आम्ही त्यांच्यासोबत जायचे ठरवले. महाराष्ट्रात वेगळा चमत्कार घडवू शकतो. दीनदुबळ्या शेतकऱ्यांना न्याय मिळेल. लाडकी बहिणसारखे चांगले उपक्रम आणले. मला खात्री आहे, आम्ही कुठल्याही अटी न टाकता त्यांच्यासोबत जायचे ठरवले. आंबेडकरी कार्यकर्त्यांना सत्तेत सामावून घेण्याचा त्यांनी आम्हाला शब्द दिलाय, असे आनंदराज आंबेडकर म्हणाले.
शिंदे सेनेत धुसफूस
माजी खासदार हेमंत गोडसे हे पक्षावर नाराज असल्याची माहिती आहे. पम आपण पक्ष नेतृत्वावर नाराज नसल्याचे स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यासाठी चांगले काम केले. मात्र, पक्षात शिस्त राहावी, यासाठी आपण अनेकदा सूचना केल्याचे त्यांनी सांगितले. पळसाला प्रत्येक ठिकाणी तीन पाने असतात, असे म्हणत त्यांनी स्थानिक पातळीवरील गटबाजीला दुजोरा दिला. पक्षात शिस्त असेल तर प्रत्येकाला न्याय मिळेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.