उपमुख्यमंत्री शिंदेंची टोलेबाजी, ठाकरेंची फटकेबाजी
मुंबई : प्रतिनिधी
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची टर्म संपल्याने त्यांना आज निरोप देण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची चांगलीच टोलेबाजी रंगली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२९ पर्यंत आम्हाला विरोधी बाकावर येण्यासाठी स्कोप नाही. परंतु उद्धव ठाकरे यांना सोबत येण्याची संधी आहे, असे म्हणत टोला लगावला. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना अंबादास दानवे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले नसल्याचे वक्तव्य केले. शिंदेंच्या याच वक्तव्याचा दाखला देत उद्धव ठाकरे यांनीही जोरदार टोलेबाजी केली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना अंबादास दानवे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले नसल्याचे वक्तव्य केले होते. याच वक्तव्याचा दाखला देत उद्धव ठाकरे यांनी काही लोक म्हणाले की, ते सोन्याचा चमचा घेऊन आले नाहीत. मात्र काही लोक असे आहेत, जे भरलेल्या ताटातून उधळून गेले आहेत, असे म्हणत एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आणि अंबादास यांनी भरल्या ताटाशी कधीच प्रतारणा केली नाही. माझ्याकडे कधीही कोणते पद न मागायला आलेला शिवसैनिक म्हणजे अंबादास दानवे आहे. पावसाळा असल्याने कोणी कधी इकडे तिकडे उड्या मारू शकतो, असे म्हणत त्यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, अंबादास दानवे त्यांची टर्म पूर्ण करत आहेत. निवृत्त होत आहेत, असे म्हणणार नाही. यावेळी त्यांनी मी पुन्हा येईन वक्तव्याचा दाखला देत फडणवीसांना चिमटा काढला. ते म्हणाले, दानवे तुम्हीही म्हटले पाहिजे मी पुन्हा येईन. आता काहीजण कौतुक करत असले तरी अंबादास यांना विरोधी पक्ष मिळणार, हे कळाल्यावर तेव्हा त्यांचे चेहरे कसे झाले माहित होते. भाजपच्या तालमीत तयार झालेला अंबादास तुम्ही दिल्याबद्दल तुमचे आम्ही आभार मानतो. मात्र, तुम्ही माझे नेले, त्यामुळे तुम्ही माझे आभार मानणार का, असा टोलाही त्यांनी लगावला.
फडणवीसांची ठाकरेंना ऑफर
विधान परिषदेमध्ये अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभाचा कार्यक्रम सुरू असताना देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना महायुतीमध्ये येण्यासाठी थेट ऑफर दिली. उद्धवजी, सध्याची परिस्थिती पाहता आम्हाला २०२९ पर्यंत तिकडे येण्याची संधी नाही. मात्र तुम्हाला इकडे येण्याची संधी आहे. त्याचा विचार करता येईल. त्याचा आपण वेगळ्या पद्धतीने करू, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मी पुन्हा येईन
अंबादास दानवे यांचा ४४ दिवसांनंतर विधान परिषदेतील कार्यकाळ संपणार आहे. त्यानिमित्त आज त्यांचा निरोप समारंभ पार पडला. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणीसांप्रमाणे मी पुन्हा येईन, पण कुठून येईन हे सांगता येणार नाही आणि त्याची चिंता करण्याची गरज नाही, अशी मिश्किल टिप्पणी अंबादास दानवेंनी यांनी केली. त्यावेळी सभागृहात हशा पिकला.