१०५ आमदारांच्या पाठिंब्याचे मुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबई : प्रतिनिधी
सणा-सुदीला, विविध उत्सवात सजावटीसाठी बाजारात येणा-या प्लास्टिक फुलांमुळे शेतक-यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे कृत्रिम फुले बंद व्हावीत व फूल उत्पादक शेतक-यांना योग्य भाव मिळावा, यासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक लावून तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तासगाव कवठेमहांकाळचे आमदार रोहित पाटील यांनी निवेदनाद्वारे केली. या मागणीला १०५ आमदारांच्या सहीसह पाठिंबा पत्र जोडत फूल उत्पादक शेतक-यांसाठी हा विषय महत्त्वाचा असल्याचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले.
याबाबत मुख्यमंत्र्यांनी लवकरच फलोत्पादन मंत्री भरत गोगावले व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्याचे आश्वासन दिले. विशेष म्हणजे मंत्री गोगावले यांनीदेखील शासन कृत्रिम फुलांवर बंदी आणेल, असे म्हटले आहे. आ. रोहित पाटील यांनी दिलेल्या निवेदनात राज्यात सर्रासपणे प्लास्टिक फुलांचा वापर प्रचंड प्रमाणात झाला. त्यामुळे शेतीतील विविध प्रकारच्या फुलांची लागवड करून सदरची फुले बाजारात प्लास्टिकच्या फुलांमुळे अत्यल्प दरात विक्री होत असल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. प्लास्टिक पिशवी वापरावर ज्याप्रमाणे शासनाने बंदी आणली, त्याप्रमाणे या प्लास्टिकच्या फुलांवर कायमस्वरूपी निर्बंध घातल्यास त्याचा शेतकरी वर्गास मोठा फायदा होणार आहे, असे म्हटले.