मुंबई : प्रतिनिधी
विधानसभेच्या निवडणुका होऊन सात-आठ महिने झाले आहेत. त्यानंतर या निवडणूक निकालांवर चर्चा सुरु असते. काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मतांची हेराफेरी झाल्याचा आरोप केला होता. आता शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभेतील पराभवावर मत व्यक्त केले आहे. सामना दैनिकात दिलेल्या मुलाखतीत त्यांनी महाविकास आघाडीतील मतभेदांवर निवडणुकीतील पराभवाचे खापर फोडले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली आहे.
लोकसभेत विजय आणि विधानसभेत पराभव झाल्याबद्दल संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारला. त्यावर उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, ईव्हीएमच्या घोटाळ्याची चर्चा सुरू आहे. मतदार याद्यांवर त्याच्याबद्दलही चर्चा आहे. बोगस मतदार, मतदार कसे वाढले हे लोकांसमोर आले आहे. पण यात मतदारसंघ छोटा होतो, तसतशी स्पर्धा वाढते. आघाडीत दोन- तीन पक्ष एकत्र आल्यावर खेचाखेची सुरू होते. युतीतही होत होती. आम्ही महाविकास आघाडी म्हणून लोकसभेची पहिली निवडणूक लढवली. त्यावेळीही शिवसेनेने जिंकलेले मतदारसंघ सोडले. विधानसभेत शेवटपर्यंत खेचाखेची सुरू होती. त्याचा दुष्परिणाम असा झाला की जनतेला वाटले यांच्यात आताच खेचाखेची आहे तर नंतर काय, त्याचा मोठा फटका बसला.
समन्वयाचा अभाव म्हणण्यापेक्षा लोकसभेचे यश सर्वांच्या डोक्यात गेले, असे सांगत उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, लोकसभेत महाविकास आघाडीत नेत्यापासून कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांमध्ये आपल्याला जिंकायचे आहे, हा आपलेपणा होता. विधानसभेत नाही नाही मला जिंकायचे आहे. हा आपल्यातून मी पणा आला. तेव्हा पराभव झाला. त्याचबरोबर ज्या तांत्रिक बाबी होत्या, त्यांनी योजना जाहीर केल्या. शेतकऱ्यांची कर्ज मुक्तीची घोषणा, असे ठाकरे यांनी सांगितले.
ही सर्वात मोठी चूक ठरली
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील फरक सांगताना उद्धव ठाकरे म्हणाले की, लोकसभेत माझ्याकडे उमेदवार होते, जागा होती, पण निशाणी नव्हती. विधानसभेत निशाणी होती, पण जागा नव्हत्या. जागा कोणत्या हा प्रश्न होता. जागा मिळाल्या तर उमेदवारी कुणाला देणार हे निश्चित नव्हते. तू तू मै मै झाली, ती स्वीकारली पाहिजे. आपल्याकडून झालेली ही सर्वात मोठी चूक होती. ही चूक परत करायची असेल तर एकत्र येण्याला काही अर्थ राहत नाही.
जास्त बोलू नये लोक
त्यांची बिनपाण्याने करतील
संजय राऊत यांनी शिंदेंवरून प्रश्न विचारला असता उद्धव ठाकरे म्हणाले, त्यांची अर्धी दाढी राहिलीय हे नशीब. त्यांनी जास्त बोलू नये, नाही तर लोक त्यांची बिनपाण्याने करतील. राहिलेली अर्धी दाढीही काढतील. महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत, तिथे दाढीचा उपयोग का करत नाहीत, ते प्रश्न का सोडवत नाहीत? असे सडेतोड उत्तर उद्धव यांनी दिले.
असे लोक परावलंबी
त्यांच्याकडे दुसरा पर्याय काय आहे? त्यांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी जे केले, त्याचे वर्णन तुम्हीच माध्यमांसमोर अलीकडेच केले. दिल्लीत जाऊन किती पाय धुवायचे आणि चाटायचे? त्यातून सगळे चित्रच डोळ्यांसमोर उभे राहिले. असे जे लोक असतात, ते परावलंबीच असतात, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
शिवसेना कोणी संपवू शकत नाही
भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी शिवेसेनेला जमीनदोस्त करण्याची भाषा केली. त्यांच्या या दाव्यावरही उद्धव यांनी सडेतोड उत्तर दिले. शिवसेना जमिनीचा दोस्तच आहे म्हणून तर हे लोक शिवसेना संपवू शकत नाहीत. आमचे पाय जमिनीवर आहेत आणि मुळे जमिनीत खोलवर गेलेली आहेत. तुम्ही जमिनीचे शत्रू आहात म्हणून तुम्ही मुंबईसह सगळी जमीन तुमच्या मित्राच्या घशात घालत आहात. तुम्ही जमिनीचे शत्रू आणि आम्ही जमिनीशी दोस्ती करणारे दोस्त आहोत, अशा शब्दांत उद्धव यांनी गिरीश महाजनांवर पलटवार केला.
ठाकरे हे नाव, लोकांचे
प्रेम चोरता येत नाही
ठाकरे म्हणजे संघर्ष हे समीकरण आहे. सर्व काही चोराल तुम्ही, पण ठाकरे हे नाव कसे चोरणार? नाव तर कोणी चोरू शकत नाही. चिन्ह किंवा आणखी काही चोरले तरी लोकांचे प्रेम कसे चोरणार? असा सवालही उद्धव यांनी विचारला.
कोणीही न मागता मी दिले
त्याचबरोबर ज्या तांत्रिक बाबी होत्या, त्यांनी योजना जाहीर केल्या. शेतकऱ्यांची कर्ज मुक्ती कुठे करत आहेत. मीच मुख्यमंत्री असा होतो कुणीही न मागता दिले. माझे मुख्यमंत्री म्हणून एकच अधिवेशन झाले पहिले. तेव्हा आम्ही सात मंत्री होतो. मी कोणीही न मागता दोन लाखापर्यंतचे पीक कर्ज मी माफ केले होते. त्यानंतर जो नियमित कर्ज फेड करतो. त्याला ५० हजारपर्यंत प्रोत्साहनपर राशी देणार होतो. दुर्देवाने कोरोनामुळे देऊ शकलो नाही. नंतर सुरुवात केली आणि सरकार पाडले, असे उद्धव ठाकरे म्हणाले.