चौघांची मुक्तता, सत्र न्यायालयाचा निकाल फिरविला
मुंबई : प्रतिनिधी
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील लोकल ट्रेनच्या फर्स्टक्लास डब्यांमध्ये ११ जुलै २००६ रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाचा धक्कादायक निकाल आज उच्च न्यायालयाने दिला. या स्फोटात २८४ जणांचा मृत्यू आणि ८०० पेक्षा अधिक जखमी झाले होते. या प्रकरणात तपास यंत्रणांनी अटक केलेल्या ४ आरोपींना सत्र न्यायालयाने फाशीची तर उर्वरित आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र, उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निकाल फिरवत सगळ््या आरोपींची दि. २१ जुलै २०२५ रोजी निर्दोष मुक्तता केली. त्यापैकी बशीर खान आणि मुजम्मिल शेख हे दोन आरोपी सध्या येरवडा कारागृहात आहेत. उच्च न्यायालयाच्या या निकालाने अनेकांना धक्का बसला.
हायकोर्टाच्या निकालानंतर बॉम्ब स्फोटातील आरोपींच्या सुटकेची प्रक्रिया सुरू झाली असून आदेश मिळताच पुण्यातील कारागृहात असलेल्या दोघांची सुटका केली जाईल. एकीकडे या निकालावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले असून ज्येष्ठ विधिज्ञ आणि खासदार उज्ज्वल निकम यांनीही प्रतिक्रिया दिली. यात आता मुंबई एटीएसने सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे म्हटले आहे.
मुंबईतील २००६ च्या पश्चिम रेल्वे साखळी बॉम्ब स्फोट खटल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालानंतर पहिल्यांदाच एटीएस म्हणजेच महाराष्ट्र राज्य, दहशतवादविरोधी पथकाने भूमिका मांडली आहे. ३० सप्टेंबर २०१५ रोजी मा. मोक्का विशेष न्यायालय, मुंबई यांनी निकाल दिला होता. त्यामध्ये ५ आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा तर ७ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणी हायकोर्टात धाव घेतली गेली होती. आता हायकोर्टाने आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
एटीएस सुप्रीम कोर्टात जाणार
दहशतवादविरोधी पथक, महाराष्ट्र राज्य, मुंबई कार्यालयाकडून सदर खटल्याचे विशेष अभियोक्ता यांच्याशी सल्लामसलत करून व निकालाच्या विश्लेषणाअंती पुढील निर्णय घेण्यात येत आहे, असे एटीएसने म्हटले. एटीएस मुंबई हायकोर्टाच्या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार आहे, असेही सांगण्यात आले.