जगाची लोकसंख्या ८ अब्जांवर, लोकसंख्येत २ दशकांत अभूतपूर्व वाढ
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जगात भारताची लोकसंख्या सर्वाधिक आहे. ताज्या आकडेवारीनुसार भारताची लोकसंख्या १४६ कोटी आहे. गेल्या २ शतकांत जगातील लोकसंख्या अभूतपूर्व वाढली आहे. आज हा आकडा आठ अब्जावर पोहचला आहे. १९६० च्या दशकांपासून आजपर्यंत केवळ ६५ वर्षांत ३ अब्जावरुन ८ अब्जांवर गेली आहे. एकीकडे लोकसंख्या झपाट्याने वाढत असली तरी काही देशांची लोकसंख्या कमी होताना दिसत आहे. विशेष म्हणजे काही देशांचे अस्तित्वच संपुष्टात येण्याचा धोका निर्माण झाला आहे.
एकीकडे जगातील लोकसंख्येचा पूर आला आहे. मात्र, काही देशांतील लोकसंख्येत घट होताना दिसत आहे. यात प्रशांत महासागरातील एक छोटे बेट तुवालू या राष्ट्राची चिंताजनक स्थिती आहे. येथील लोकसंख्या निव्वळ १० हजारांच्या आसपास आहे. ही लोकसंख्या सातत्याने घटत असून, या घसरणीने या देशाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संयुक्त राष्ट्राच्या अंदाजानुसार जगाची लोकसंख्या २०३० पर्यंत ८.६ अब्जापर्यंत पोहोचणार आहे. जी २०५० पर्यंत ९.८ अब्ज आणि २१०० पर्यंत ११.२ अब्ज होणार आहे. मात्र, युक्रेन, जपान आणि ग्रीस या देशांतील लोकसंख्या कमी होत आहे.
युक्रेनच्या लोकसंख्येत घट,
तुवालूचे अस्तित्व धोक्यात
युक्रेनमध्ये २००२ ते २०२३ दरम्यान लोकसंख्या सुमारे ८ टक्के घटली आहे. ज्यास युद्ध आणि मोठे स्थलांतर जबाबदार आहे. याच धर्तीवर तुवालू देशात दरवर्षी लोकसंख्या १.८ टक्क्यांनी कमी होत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
युरोपातील अनेक देशांतही घसरण
युरोपातील अनेक देशांच्या लोकसंख्येतही घसरणीची नोंद झाली आहे. ग्रीसमध्ये एकाच दिवसात १.६ टक्के लोकसंख्या कमी झाली तर सॅन मारिनो, कोसोवो, बेलारुस, बोस्रिया आणि अल्बानियासारख्या देशातही लोकसंख्या घटू लागली आहे. रशियाचा शेजारील देश बेलारुसमध्ये लोकसंख्येत सुमारे ०.६ टक्के घट नोंदली गेली. जपानच्या लोकसंख्येतही अर्धा टक्का घट झाली. यामागे स्थलांतर हे मुख्य कारण आहे. तसेच जन्मदर सातत्याने घसरत आहे.
युरोपमध्ये निरंतर घट
महाखंडांचा विचार करता युरोपमध्ये लोकसंख्या निरंतर कमी होत आहे तर आशिया महाखंडात लोकसंख्या वेगाने वाढत आहे. चीन, भारत, पाकिस्तान आणि इंडोनेशियासारखे मोठे देश या वाढीला कारणीभूत आहेत. रशिया, इटली आणि दक्षिण कोरियासारखे देशही या आव्हानांचा सामना करत आहेत.