नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी दि. २४ जुलै रोजी ब्रिटनच्या दौ-यावर होते. या दौ-यात भारत आणि ब्रिटन यांच्यात मुक्त व्यापार करार झाला. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांनी चेकर्स हाऊसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले. या दरम्यान भारताचे वाणिज्य मंत्री पियुष गोयल आणि ब्रिटनचे वाणिज्य मंत्री जोनाथन रेनॉल्डस यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.
भारत आणि ब्रिटन यांच्यातील या करारामुळे दोन्ही देशांमध्ये व्यापारासंदर्भातील नव्या अध्यायाची सुरुवात होणार आहे. यामुळे दोन्ही देशांमधील गुंतवणूक वाढेल. याशिवाय सामान्य लोकांना रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होतील. एफटीएमुळे औषध, कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, फॅशनचे साहित्य, स्वस्त होईल. काही गोष्टी महागतील, असे सांगण्यात आले.
वस्त्रोद्योग आणि कापड व्यापार
भारतातून ब्रिटनला निर्यात केल्या जाणा-या कापड आणि होम टेक्सटाईल उत्पादनांवर सध्या ८ ते १२ टक्के टॅरिफ आहे, ते रद्द केले जाईल. यामुळे भारत आता बांगलादेश आणि व्हिएतनाम या सारख्या कापड निर्यातदार देशांचा स्पर्धक बनेल.
रत्न, दागिने आणि चर्मोद्योग
या करारामुळे सोने आणि हिरे यासारख्या मौल्यवान उत्पादनांसह चामड्याच्या वस्तूंवरील करदेखील ब्रिटनकडून हटवला जाईल. यामुळे कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही. भारताच्या लघुउद्योग आणि अलिशान ब्रँडसला याचा फायदा होईल.
अभियांत्रिकी वस्तू आणि ऑटो पार्टस
भारतात बनवल्या जाणा-या मिशनरी, अभियांत्रिकी टूल्स, वाहनांचे सुटे भाग यावर ब्रिटनकडून आयात शुल्क लादले जाणार नाही. त्यामुळे यूके आणि यूरोपच्या औद्योगिक सप्लाय चेनमध्ये भारताची भागीदारी वाढेल.
आयटी आणि प्रोफेशनल सेवा
मुक्त व्यापार करारामुळे इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर आणि अकाऊंटिंग या क्षेत्रात प्रोफेशनल क्वालिफिकेशन्स आणि व्हिसा नियमांमध्ये सूट दिली जाईल. भारताचे प्रोफेशनल्स आता ब्रिटनमध्ये जाऊन काम करु शकतात. यामुळे आयटी, फायनान्स, कायदा आणि आरोग्य या क्षेत्रात पाच वर्षात ६० हजार नव्या नोक-या निर्माण होऊ शकतात.
औषध आणि वैद्यकीय उपकरण
या व्यापार करारामुळे भारतीय औषध कंपन्यांना ब्रिटनमधील नियामक प्रक्रिया सोपी झाल्याने फायदा होईल. औषध स्वस्त होतील. जेनेरिक औषधांची निर्यात होऊ शकते. भारतीय कंपन्यांच्या औषधांना मंजुरी प्रक्रिया सोपी होईल.
अन्न प्रक्रिया, चहा, मसाले, सागरी उत्पादने
बासमती तांदूळ, झिंगा यासारखी सागरी उत्पादने, प्रिमियम चहा, मसाले यासह भारतीय कृषी उत्पादनांच्या आयातीवरील कर हटवले जातील. आसाम, गुजरात, केरळ आणि पश्चिम बंगालच्या राज्यातील निर्यातदारांना फायदा होईल.
केमिकल्स आणि स्पेशालिटी मटेरिअल्स
मुक्त व्यापार करारामुळे कृषी क्षेत्रातील रसायने, प्लास्टिक, स्पेशल केमिकल्स यावरील कमी टॅरिफमुळे गुजरात आणि महाराष्ट्रच्या निर्यातदारांना फायदा होईल. व्यापार करारानुसार २०३० पर्यंत ब्रिटनसोबत रसायन निर्यात दुप्पट करण्याचे भारताचे लक्ष आहे.
ग्रीन एनर्जी आणि क्लीन टेक
या करारामुळे सौर ऊर्जा, ग्रीन हायड्रोजन, इलेक्ट्रिक वाहनांसाठीच्या पायाभूत सुविधा यामुळे रिन्यूएबल एनर्जी क्षेत्रात भारत आणि ब्रिटनच्या संयुक्त कंपन्या सुरु होऊ शकतात. ब्रिटन भारतातील क्लीन एनर्जी क्षेत्रात गुंतवणूक करु शकते.
दारुवरील आयात शुल्क कमी
भारत आणि ब्रिटन यांच्यातील व्यापार कराराचा फायदा दारु पिणा-यांना होणार आहे. भारत पुढील १० वर्ष स्कॉच व्हिस्कीवर १५० टक्के टॅरिफ घटवून ३० टक्के करेल. भारत आणि ब्रिटन यांच्यातील व्यापार वाढेल.