मुंबई : प्रतिनिधी
लाडकी बहीण योजनेचा महिलाच नाही तर चक्क पुरुषांनीदेखील लाभ घेतल्याचे आता समोर आले आहे. राज्यातील १४ हजारांपेक्षा अधिक पुरुष या योजनेचा लाभ घेत आहेत. ज्या पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतला आहे, त्यांचे पैसे वसूल करणार असल्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रातील ज्या कुटुंबांचे उत्पन्न अडीच लाखांच्या आत आहे, त्या कुटुंंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण नावाची योजना सुरू केली आहे, या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. मात्र ही योजना सुरू करताना काही अटीदेखील घालण्यात आल्या होत्या. मात्र अनेक महिलांनी या अटीचे उल्लंघन करून या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे, आता अशा महिलांची नावे या योजनेतून वगळण्याचे काम सुरू आहे. विशेष म्हणजे त्यांच्याकडून लाभाची रक्कम वसूल करण्यात येणार असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे.
ही योजना ज्या कुटुंबांचे उत्पन्न हे अडीच लाखांच्या आत आहे, अशाच कुटुंबातील महिलांसाठी आहे, मात्र ज्यांना सरकारी नोकरी आहे, अशा महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतला असल्याचे योजनेच्या पडताळणीमध्ये समोर आले आहे. एवढेच नाही तर एक कुटुंबातील दोन महिलांना या योजनेचा लाभ दिला जातो. मात्र काही ठिकाणी दोनपेक्षा अधिक महिलादेखील या योजनेचा लाभ घेत असल्याचें समोर ओले आहे. ही योजना ज्यांचे वय ६५ वर्षांपेक्षा कमी आहे, अशाच महिलांसाठी आहे. मात्र अनेक ठिकाणी ६५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या महिलांनीदेखील या योजनेचा लाभ घेतला आहे, अशा महिलांचे नावं या योजनेतून कमी केली जाते आहे.