चौथी कसोटी अनिर्णित. दोघांचेही शानदार शतक
मँचेस्टर : वृत्तसंस्था
इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या सामन्यातील दुस-या डावात भारतीय संघाचे आघाडीचे फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर चौथा सामना हरणार, अशी चर्चा रंगली होती. मात्र, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर या दोघांच्याही शानदार शतकांमुळे मॅच ड्रॉ झाली. यामुळे विजयाचे स्वप्न पाहणा-या इंग्लंडचे गर्वहरण झाले. या सामन्यात जडेजा-वॉशिंग्टन सुंदरची विक्रमी भागिदारी झाली असून, जडेजा नाबाद १०७ आणि वॉशिंग्टन सुंदरने नाबाद १०० धावा केल्या.
भारतावर पराभवाची नामुष्की ओढवली होती. मात्र, भारताने पाचव्या दिवशी दिमाखदार खेळ केला. त्यामुळे सामना ड्रॉ राखण्यात यश आले. या सामन्यात गिलनंतर (१०३) रवींद्र जडेजा (नाबाद १०७) आणि वॉशिंग्टन सुंदर (नाबाद १००) यांनी शतक झळकावत इंग्लंडला हतबल करून सोडले. भारताने ४ बाद ४२४ अशी धावसंख्या करत आपला डाव घोषित केला. इंग्लंडनेही यावेळी हार मानली.
इंग्लंडने या सामन्यात ६०० धावांचा पल्ला ओलांडला. भारतावरर ३११ धावांची आघाडीही घेतली होती. त्यानंतर इंग्लडने भारताचे दोन फलंदाज शून्यावर बाद केले. त्यामुळे भारताचा चौथ्याच दिवशी पराभव होईल, असे म्हटले जात होते. पण त्यानंतर मैदानात शुभमन गिल आणि केएल राहुल समर्थपणे उभे राहिले. या दोघांनी चौथा दिवस खेळून काढला. पण त्यानंतरही पाचव्या दिवशी भारतीय संघावर पराभवाची टांगती तलवार होती.
पाचव्या दिवशी जेव्हा भारतीय संघ मैदानात उतरला. त्यावेळी राहुल आणि गिल यांनी दमदार फलंदाजी केली. राहुल शतकासमीप आला होता. पण त्याने ८ चौकारांच्या जोरावर ९० धावांची खेळी साकारली. त्यानंतर गिलने शतक झळकावत इतिहास रचला. गेल्या ३५ वर्षांत भारताचे या मैदानातील पहिले शतक ठरले. शतकानंतर गिलला जास्त फलंदाजी करता आली नाही. लंचला १० मिनिटे असताना तो बाद झाला.
गिल बाद झाला तरी वॉशिंग्टन सुंदर (नाबाद १०१) आणि रवींद्र जडेजा (नाबाद १०७) यांनी इंग्लंडच्या गोलंदाजीची पिसे काढली. इंग्लंडचे गोलंदाज जडेजा आणि सुंदर यांच्यापुढे नतमस्तक झाल्याचे पाहायला मिळाले. पण जडेजा आणि सुंदर यांनी यावेळी दमदार फलंदाजी केली आणि भारताला सामना ड्रॉ करून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
जडेजाचा विक्रम
इंग्लंडमध्ये जडेजाने नेहमीच अप्रतिम फलंदाजी केली. या मालिकेत त्याने आधी ४ अर्धशतके ठोकली. त्यानंतर आज पाचवे शतक ठोकले. आता तो इंग्लंडच्या मैदानावर नंबर ६ च्या खाली फलंदाजी करताना २ शतक करणारा जगातील एकमेव फलंदाज ठरला. जडेजाने या मालिकेत ४५४ धावा केल्या.
वाशिंग्टनचे पहिले शतक
जडेजासोबत वॉशिंग्टन सुंदरनेही शानदार फलंदाजी करीत कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. नाबाद १०१ धावा करीत सुंदरने चौथा सामना अनिर्णित ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.