उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा
मुंबई : प्रतिनिधी
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी कोणालाही अपेक्षा नसताना अचानक वांद्रे येथील मातोश्री निवासस्थान गाठत उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. वरळीतील मराठी विजयी मेळाव्यात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र आले होते. मात्र, त्यानंतर मनसे-ठाकरे गटाच्या युतीची चर्चा हवेतच विरून गेली का, असे वाटू लागले होते. परंतु राज ठाकरे यांनी तब्बल २० वर्षांनंतर रविवारी मातोश्री गाठत सर्वांनाच सुखद धक्का दिला आणि उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
राज ठाकरे हे आज उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर येतील, असे कोणालाही वाटले नव्हते. मात्र, रविवारी सकाळी राज ठाकरे यांनी अचानक मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी जायचे, हे ठरवले. त्यानंतर त्यांनी बाळा नांदगावकर यांच्या फोनवरून संजय राऊत यांना कॉल लावला. मी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर येत आहे, असे सांगितले. संजय राऊत यांनी ही गोष्ट लगेचच उद्धव ठाकरे यांना सांगितली. त्यानंतर राज ठाकरे दादर परिसरातील आपल्या शिवतीर्थ या निवासस्थानावरुन बाहेर पडले आणि ते अवघ्या काही मिनिटांत मातोश्रीवर पोहोचले.
राज ठाकरे मातोश्रीवर येत असल्याची माहिती मिळताच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य संचारले. राज ठाकरे यांची गाडी मातोश्रीच्या प्रवेशद्वारावर आली, तेव्हा त्यांच्या गाडीला ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा गराडा पडला. इतक्यात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत गेटच्या बाहेर आले आणि त्यांनी राज ठाकरेंचे स्वागत केले.
मातोश्रीच्या गेटवर येऊन
राज यांना मारली मिठी
उद्धव ठाकरेही राज ठाकरे यांचे स्वागत करण्यासाठी स्वत: मातोश्रीच्या गेटवर उभे होते. राज ठाकरे येताच उद्धव ठाकरे यांनी त्यांना मिठी मारली. त्यावेळी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या हातात लालभडक गुलाबांचा मनमोहक पुष्पगुच्छ देत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.