वुमन्स चेस वर्ल्डकपमध्ये ठरली चॅम्पियन, अंतिम लढतीत कोनेरू हम्पीचा पराभव
दिव्या वर्ल्ड कप जिंकणारी
पहिली भारतीय महिला
जॉर्जिया : वृत्तसंस्था
भारताची तरुण बुद्धिबळपटू, महाराष्ट्राची कन्या दिव्या देशमुखने सोमवार, दि. २८ जुलै २०२५ रोजी इतिहास घडवत वूमन्स चेस वर्ल्ड कप चॅम्पियनचा बहुमान पटकावला आहे. दिव्याने फायनलमध्ये भारताच्या कोनेरू हम्पी हिचा पराभव करत यशाची भरारी घेतली. १९ वर्षीय दिव्या वूमन्स चेस वर्ल्ड कप जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली. यामुळे दिव्या देशमुख हिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तिचे अभिनंदन केले.
वर्ल्ड चेस चॅम्पियन फायनलमध्ये कोनेरू हम्पी आणि दिव्या देशमुख या दोन्ही भारताच्या लेकी होत्या. त्यामुळे भारतातच हा वर्ल्ड कप येणार, हे निश्चित होते. मात्र, दोघींपैकी या वर्ल्ड कपवर कोण नाव कोरणार, याची उत्सुकता होती. मात्र, दिव्याने चाली करत कोनेरुला पराभवाची धूळ चारली. विजय मिळवताच दिव्याच्या डोळ््यात आनंदाश्रू पाहायला मिळाले तर दुस-या बाजूला कोनेरू हम्पीला अंतिम फेरीत येऊन पराभूत व्हावे लागल्याने उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
दिव्याने कोनेरूला चाली करत करत चुका करण्यास भाग पाडले. दिव्याने यासह कोनेरूला मागे टाकले आणि इतिहास घडवला. दिव्या यासह भारतासाठी चेस वर्ल्ड कप जिंकणारी पहिली महिला ठरली. विशेष म्हणजे दिव्या आता चौथी महिला ग्रँडमास्टर ठरणार आहे.
खरे तर टायब्रेकर रॅपिड फॉर्मेटमध्ये दिव्याच्या तुलनेत कोनेरूला फार अनुभव होता. त्यामुळे कोनेरू दिव्यावर वरचढ ठरण्याची शक्यता होती. मात्र दिव्याने गेम फिरवला आणि विश्व चॅम्पियनचा बहुमान पटकावला. महाराष्ट्राच्या कन्येने जागतिक सन्मान मिळविल्याने तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
एफआयडीई महिला वर्ल्ड कपमध्ये प्रथमच २ भारतीय खेळाडू एकमेकांसमोर होते. अंतिम सामन्यात दिव्या आणि हम्पी यांच्यात रोमांचक स्पर्धा पाहायला मिळाली. अंतिम सामन्याची सुरुवात क्लासिकल गेमने झाली. दोन्ही क्लासिकल गेम अनिर्णित राहिले. त्यामुळे सामन्याचा निकाल टायब्रेकरमध्ये लागला.