भारतीय आयात वस्तूंवर २५ टक्के कर, रशियाचा राग भारतावर काढला
वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
अमेरिकेने भारताविरोधातही आता डोळे वटारले असून, भारतातून अमेरिकेत निर्यात होणा-या वस्तूंवर आता २५ टक्के टॅरिफ म्हणजेच २५ टक्के आयात शुल्क लादले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ या सोशल प्लॅटफॉर्मवर ही घोषणा केली. रशियाचा राग भारतावर काढत ट्रम्प यांनी युक्रेनमध्ये हत्याकांड घडवणा-या रशियाकडून भारताने लष्करी साहित्य आणि उर्जा खरेदी केल्याने भारतावर मोठे शुल्क लावत असल्याचे म्हटले. रशियासोबतच्या व्यापारामुळे भारताला या शुल्काव्यतिरिक्त दंडही भरावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. १ ऑगस्टपासून हा नवा कर लागू होणार आहे.
भारत आपला मित्र देश असला तरी आपण त्यांच्याशी तुलनेने कमी व्यवसाय केला आहे. कारण त्यांचे आयात शुल्क जगातील सर्वांत जास्त आहे आणि त्यांच्याकडे सर्वात कठीण आणि त्रासदायक गैरआर्थिक व्यापार अडथळे आहेत. याशिवाय त्यांनी नेहमीच त्यांचे बहुतांश लष्करी साहित्य रशियाकडून खरेदी केले आहे आणि ते रशियाचे ऊर्जेचे सर्वांत मोठे खरेदीदार आहेत. मात्र, आता रशियाकडून शस्त्र, तेल खरेदी केल्यास दंड आकारला जाणार असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
दरम्यान, भारत आणि अमेरिका संबंधांत सारे काही आलबेल नाही. भारत-पाकिस्तान युद्ध हे आपल्यामुळे थांबले, असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. पण भारताने ते नाकारले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालच लोकसभेत कोणत्याही नेत्याच्या सांगण्यावरून आपण निर्णय घेतना नाही, असे म्हटले. यानंतर आज अमेरिकेने भारतावर २५ टक्के टॅरिफ लावला. १ ऑगस्टपासून भारतीय वस्तूंवर २५ टक्के टॅरिफ आकारला जाणार आहे. भारत-अमेरिका व्यापार करारावर मागच्या ब-याच दिवसांपासून चर्चा होती. अखेर २५ टक्के टॅरिफ वाढवत ट्रम्प यांनी याबद्दल एक्सवरवर याबद्दल माहिती दिली.
रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. यामुळे रशियाने भारताला कमी किंमतीमध्ये क्रूड ऑईल उपलब्ध करून दिले. भारताला लागणा-या तेलाच्या ४० टक्के तेलाची आयात भारताने रशियाकडून केली. हे अमेरिकेला आवडले नसावे. त्यामुळे त्यांनी तसा निर्णय घेतला आहे. परंतु ट्रम्प यांचे मागील निर्णय पाहाता याबाबत ते यूटर्न घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भारताला दंडाची ही शिक्षा!
चीनसह सर्वजण रशियाला युक्रेनमधील हिंसा थांबवण्यास सांगत आहेत. हे सर्व काही चांगले नाही. त्यामुळे भारताला १ ऑगस्टपासून २५ टक्के आयात शुल्क तसेच वरील कारणांसाठी दंड आकारला जाईल. भारताने रशियाकडून तेल आणि शस्त्र खरेदी केल्यास दंड लावण्यात येईल, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.