तज्ज्ञांची समिती नेमण्याचे मुंबई हायकोर्टाचे आदेश
मुंबई : प्रतिनिधी
कबुतरांना अन्न, पाणी देण्याची बंदी मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवार, दि. ७ ऑगस्ट २०२५ रोजी कायम ठेवली. यासंदर्भात तज्ज्ञांची समिती नेमण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या संदर्भातील पुढील सुनावणी बुधवारी होणार असून त्यावेळी महाअधिवक्त्यांना हजर राहण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबईतील सर्व कबुतरखाने बंद करण्यात आले. मात्र काही समुदायांनी त्याला विरोध केला. कबुतरखान्यांमध्ये धान्य टाकत न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसवले. याबद्दल न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.
मुंबई उच्च न्यायालयाने कबुतरखाने बंद करण्याचा निर्णय दिला. त्याविरोधात जैन समाजाने आक्रमक भूमिका घेतली. दादर पश्चिमेला असलेल्या प्रसिद्ध कबुतरखान्याच्या परिसरात जैन बांधव जमले. त्यांनी आंदोलन केले. याचे राजकीय पडसादही उमटले. या प्रकरणी न्यायालयाने संविधानाने प्रत्येकाला जगण्याचा अधिकार दिलेला आहे. पण काही विशिष्ट लोकांकडून धान्य टाकण्याचा प्रयत्न होत असेल तर हा प्रकार चुकीचा असल्याचे मत न्यायालयानं सुनावणीवेळी व्यक्त केले.
कबुतरखान्यांसंदर्भात निर्णय घेण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश असलेली समिती स्थापन करण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या. या समितीचा अहवाल सगळ््यांसाठी बंधनकारक असून यात नागरिकांचे आरोग्य महत्त्वाचे आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.