आमदार अमोल मिटकरींच्या पोस्टने नवा वाद
मुंबई : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे यांना रायगडावरील वाघ्या कुत्रा तर चावला नाही ना, अशी पोस्ट अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी “एक्स ” या सोशल मीडियावर केल्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
संभाजी भिडे यांच्यावर सोमवारी रात्री सांगली येथील माळी गल्ली भागात एका कुत्र्याने हल्ला चढवला होता. कुत्र्याने त्यांच्या पायाला चावा घेतल्याने ते जखमी झाले होते. या घटनेनंतर सांगली महापालिकेने शहरात मोकाट कुत्र्यांची धरपकड सुरू केली आहे. या घटनेवर आमदार अमोल मिटकरी यांनी एक्सवर पोस्ट करून संभाजी भिडे यांना चिमटा काढला आहे. “त्यांना” चावलेला कुत्रा वाघ्या तर नव्हता ना? ….. जो कुणी असेल त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. खटला फास्ट ट्रॅक मध्ये चालला पाहिजे. चावतो म्हणजे काय? मुगलाई लागलीय का? असा सवाल मिटकरी यांनी आपल्या पोस्टद्वारे केला आहे. त्यांच्या या पोस्टवर उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहे.
विजय वडेट्टीवारांची टीका
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही या प्रकरणी संभाजी भिडे यांच्यावर उपरोधिक टीका केली होती. कुत्र्याला कुठून दुर्बुद्धी सुचली… कुणाला चावावे हे कुत्र्याला कळले नाही याचे वाईट वाटते. आता कुठला कुत्रा पोलिस शोधत आहेत, याची माहिती अजून मिळालेली नाही, पण मी माहिती घेतो, असे ते म्हणाले. कुत्रा हा प्रामाणिक प्राणी असतो, मात्र या प्रामाणिक कुत्र्याने का असा राग धरला? यासंदर्भात खरंतर एसआयटी वैगरे लावून चौकशी केली पाहिजे, असेही ते म्हणाले.
जितेंद्र आव्हाडांनी काढला होता चिमटा
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही मंगळवारी संभाजी भिडेंना कुत्रा चालवण्यात आल्यानंतर मोकाट कुत्र्यांविरोधात सुरू करण्यात आलेल्या कारवाईवर उपरोधिक टीका केली होती. ते म्हणाले होते, माझ्या शहरातही कत्रे खप वाढले आहेत. आता कुत्रे काही उचलले जात नाहीत. आता महत्त्वाच्या माणसाला ते चावावेत, अशी आपण देवाकडे प्रार्थना करूयात, म्हणजे सर्वसामान्यांना न्याय मिळेल. या सरकारमध्ये कुत्राही मोठ्या व्यक्तीला चावला तर पकडला जातो. सरकारची कार्य करण्याची पद्धत चांगली आहे.