व्हॅटिकन सिटी : वृत्तसंस्था
कॅथॉलिक ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले. व्हॅटिकनने दिलेल्या माहितीनुसार पोप यांनी आज (२१ एप्रिल) स्थानिक वेळेनुसार सकाळी ७ वाजून ३५ मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला. पोप फ्रान्सिस हे इतिहासातील पहिले लॅटिन अमेरिकन पोप होते. पंतप्रधान मोदींनी यांनी पोप यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.
गेल्या काही महिन्यांपासून ते आरोग्याच्या समस्यांनी त्रस्त होते. १४ फेब्रुवारी रोजी त्यांना रोमच्या जेमेली रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. न्यूमोनिया आणि अशक्तपणामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. फुफ्फुसाच्या संसर्गामुळे त्यांना पाच आठवडे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान पोप यांच्या रक्त तपासणी अहवालात मूत्रपिंड निकामी होण्याची लक्षणे दिसून आली. तथापि, त्यांना १४ मार्च रोजी डिस्चार्ज देण्यात आला. आज त्यांची प्राणज्योत मालवली. पोप फ्रान्सिस हे १ हजार वर्षांत पोप म्हणून निवडले जाणारे पहिले बिगर-युरोपियन होते.
पोप फ्रान्सिस यांनी समलैंगिकांना चर्चमध्ये येण्याची परवानगी देणे, त्यांना आशीर्वाद देणे आणि पुनर्विवाहाला धार्मिक मान्यता देणे असे मोठे निर्णय घेतले. चर्चमध्ये मुलांवरील लैंगिक शोषणाबद्दल त्यांनी माफीही मागितली. पोप फ्रान्सिस हे अर्जेंटिनाचे जेसुइट धर्मगुरू होते, जे २०१३ मध्ये रोमन कॅथॉलिक चर्चचे २६६ वे पोप बनले. त्यांना पोप बेनेडिक्ट सोळावे यांचे उत्तराधिकारी म्हणून निवडण्यात आले होते.