दराने सर्वच रेकॉर्ड तोडले, दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
एकीकडे उन्हाची तीव्रता वाढत असताना सोन्याच्या भावाने अखेर सोमवार, दि. २१ एप्रिल २०२५ रोजी लाखाची वेस ओलांडली. कमजोर झालेला डॉलर आणि अमेरिका-चीन व्यापार युद्ध यावरून अनिश्चितेचे वातावरण असताना आता चलनवाढ झाल्याने राजधानी दिल्लीत सोमवारी सोन्याच्या भावाने १ लाख रुपयाचा टप्पा ओलांडला आणि आज प्रतितोळा दर १ लाख ११६ रुपयांवर पोहोचला. यामध्ये वस्तू व सेवा कराच्या रकमेचा समावेश केल्यास ग्राहकांना एक तोळा सोने खरेदीसाठी १ लाखांपेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. त्यामुळे सोने आता सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे.
राजधानी दिल्लीत सोन्याचे भाव एका तोळ््यासाठी एका लाखाच्या पुढे गेले आहेत. दिल्ली सराफा बाजारात २१ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ६.२८ वाजेपर्यंत १० ग्रॅम सोन्याचा भाव १ लाख २५० रुपयांच्या पुढे पोहचला आहे. सायंकाळी सोन्याच्या दराने १ लाखाचा टप्पा ओलांडला. या अगोदर शुक्रवारी प्रतितोळा सोन्याचा दर ९८,१५० रुपये होता. परंतु आज सायंकाळी अचानक सोन्याच्या दराने उसळी घेतली आणि सोने एक लाखाच्याही पार गेल्याचे अखिल भारतीय सराफ संघाने म्हटले आहे.
येत्या ३० एप्रिलला अक्षय तृतीया आहे. हा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त समजला जातो. यादिवशी सोन्याचा भाव एक लाखांचा टप्पा ओलांडेल, असा अंदाज होता. मात्र, त्यापूर्वीच सोन्याच्या भावाने लाखाचा टप्पा पार केला. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी सोन्याचा भाव नवा उच्चांक गाठेल, अशी शक्यता आहे.