पोलिस, कोब्रा, राखीव दलाची संयुक्त कारवाई
बिजापूर : वृत्तसंस्था
छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यातील करेगुट्टा जंगल परिसरात सुरक्षा जवान आणि नक्षल्यांत जोरदार चकमक सुरू असून, आतापर्यंत झालेल्या चकमकीत ७ नक्षल्यांचा खात्मा करण्यात आला. घटनास्थळी सुमारे १ हजार नक्षलवादी उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे. या नक्षल्यांना आता १० हजार सुरक्षा जवानांनी घेरले आहे. त्यामुळे ही सर्वांत मोठी कारवाई मानली जात आहे.
जिल्हा राखीव रक्षक दल, बस्तर फायटर्स, विशेष टास्क फोर्स, राज्य पोलीस दल, केंद्रीय राखीव पोलीस दल आणि कोब्रा बटालियन यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई सुरू केली असून, गुप्तचर माहितीच्या आधारे ही मोहीम आखण्यात आली. बिजापूर जिल्ह्यातील उसूर पोलिस ठाणे क्षेत्रातील गलगम-नडपल्ली परिसरातील डोंगराळ भागात ही चकमक सुरू आहे. परिसरात सतत गोळीबाराचा आवाज ऐकू येत आहे. याच दरम्यान, एक आयईडी स्फोट झाला असल्याची माहितीही समोर आली.
मोस्ट वॉन्टेड नक्षल कमांडर हिडमा आणि बटालियन प्रमुख देवा याच्यासह इतर महत्त्वाच्या नक्षल नेत्यांची हालचाल या भागात असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली होती. त्यानंतर व्यापक पातळीवर ही कारवाई सुरु करण्यात आली.