बंगळुरू : वृत्तसंस्था
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) माजी प्रमुख डॉ. के. कस्तुरीरंगन यांचे दि. २५ एप्रिल २०२५ रोजी सकाळी निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. कस्तुरीरंगन यांनी बंगळुरू येथील त्यांच्या निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. २७ एप्रिल रोजी त्यांचे पार्थिव रमण संशोधन संस्थेत (आरआरआय) जनतेच्या दर्शनासाठी ठेवण्यात आले होते.
कस्तुरीरंगन यांना दोन वर्षांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. तेव्हापासून ते आजारी होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली. कस्तुरीरंगन हे १९९४ ते २००३ पर्यंत इस्रोचे प्रमुख होते. त्यांच्या नेतृत्वाखाली इस्रोने चांद्रयानासारख्या मोठ्या मोहिमांची योजना आखण्यास सुरुवात केली. ते नवीन शिक्षण धोरणाच्या (एनईपी) मसुदा समितीचे अध्यक्षही होते. कस्तुरीरंगन यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे कुलगुरू आणि कर्नाटक ज्ञान आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले होते. ते २००३ ते २००९ पर्यंत राज्यसभेचे सदस्य होते. त्यांनी तत्कालीन भारतीय नियोजन आयोगाचे सदस्य म्हणूनही काम केले. कस्तुरीरंगन हे एप्रिल २००४ ते २००९ पर्यंत बंगळुरूस्थित नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड स्टडीजचे संचालक होते. त्यांनी केंद्राच्या अनेक समित्यांचे नेतृत्व केले.
पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
कस्तुरीरंगन यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला. भारताच्या वैज्ञानिक आणि शैक्षणिक प्रवासातील एक महान व्यक्तिमत्व असलेले डॉ. के. कस्तुरीरंगन यांच्या निधनाने खूप दु:ख झाले आहे. त्यांचे दूरदर्शी नेतृत्व आणि राष्ट्रासाठी निस्वार्थ योगदान नेहमीच लक्षात ठेवले जाईल, असे म्हटले.