उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक
पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत शुक्रवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये जिल्हा वार्षिक योजना २०२५-२६ बाबत सविस्तर चर्चा झाली. या बैठकीत चंद्रकांत पाटील यांनी सहभागी होऊन; जिल्ह्यातील विकासाच्या अनुषंगाने चर्चा करताना, मंजूर कामे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण होण्यासाठी आवश्यक सूचना केल्या.
अजित पवार यावेळी म्हणाले, जिल्ह्यातील लोकप्रतिनिंधी विकास कामांची माहिती १५ मे पर्यंत प्रशासनाकडे सादर करावी. सर्व संबंधित यंत्रणांनी ३१ मे अखेर प्रशासकीय मान्यता घेवून पुढील कार्यवाही डिसेंबरअखेर पूर्ण करावी. जिल्हा नियोजन समितीमध्ये मंजूर कामाचा आढावा घेतला जाणार असून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी विकासकामे वेळेत, दर्जेदार, गुणवत्तापूर्वक होईल याकडे लक्ष द्यावे. गडकिल्ले, पर्यटनस्थळे आदी ठिकाणे पर्यटकांना सुरक्षित वाटली पाहिजे, याकरीता आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात.
जिल्ह्यात पुणे मॉडेल स्कूल अर्थात आदर्श शाळांचा उपक्रम राबविण्याचे निर्देश देण्यात आले असून त्या अंतर्गत प्रत्येक तालुक्यातील केंद्र शाळा स्तरावर एका मोठ्या शाळेचा भौतिक तसेच दर्जात्मक विकास करण्यात येणार आहे. भौतिक सुविधांसोबतच शिक्षणाचा दर्जा कसा वाढेल याकडे लक्ष द्यावे.
नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करुन द्यावे. लोकप्रतिनिधी सूचित केलेल्या सूचना, तक्रारीचे दखल घेत त्यांना विश्वासात घेवून त्या निकाली काढाव्यात. जिल्ह्यातील सर्व तालुक्यात एकसारखा निधी दिला जाईल, याबाबत दक्षता घ्यावी. रुग्णालयात विविध आजाराकरीता उपचारासाठीची लागणारी पुरेशी औषधे उपलब्ध ठेवावीत. धर्मादाय रुग्णालयांनी रुग्णांकडून अनामत रक्कम घेऊ नये असा निर्णय घेण्यात आला आहे. या नियमांचे उल्लघंन करणाऱ्या रुग्णालयांवर कठोर कारवाई करण्यात येईल, याकामी जिल्हाप्रशासन, महानगरपालिका आयुक्त आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावे,असेही पवार म्हणाले.
या बैठकीस मंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ, विधान परिषदेच्या उपसभापती निलमताई गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष आण्णा बनसोडे यांच्यासह विधिमंडळातील पुणे जिल्ह्यातील सहकारी तसेच जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.