मंत्री झिरवाळांचे घूमजाव, सत्ता मिळताच बहिणींचा विसर
जळगाव : प्रतिनिधी
राज्यात यंदाच्या विधानसभा निवडणुकांपूर्वी सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली. या योजनेतून महिलांना दरमहा १५०० रुपये देण्यात येत असून निवडणुकांच्या जाहीरनाम्यात पुन्हा महायुतीचे सरकार आल्यास लाभार्थी महिलांना २१०० रुपये देण्याचे आश्वानस सरकारने दिले होते. मात्र, अद्यापही महिलांना २१०० रुपये दिले नाहीत. या आधी अर्थमंत्री अजित पवार यांनी यापूर्वी बजेट पाहून निर्णय घेऊ, असे म्हटलं होते तर आता राज्याचे कॅबिनेटमंत्री नरहरी झिरवळ यांनी २१०० रुपये लाडक्या बहिणींना देण्याचे कुणीच म्हंटले नाही, असे म्हणत चक्क घूमजाव केला आहे.
लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्यातील हफ्ता कधी जमा होणार, याची प्रतिक्षा सध्या लाडक्या बहिणींना आहे. तसेच १५०० रुपयांचे २१०० कधी होणार याची उत्सुकता आहे. मात्र, लाडक्या बहिणींच्या हप्त्यावरुन सत्ताधाºयांची टोलवाटोलवी सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. लाडक्या बहिणींना २१०० रुपये देऊ असे कुणीच म्हटले नाही, असे अन्न आणि औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवळ यांनी म्हटले. विरोधकांनीच २१०० रुपयांवर जोर लावला. लाडक्या बहिणींना १५०० रुपयेही पुरेसे आहेत, त्या खूश आहेत, असे म्हणत झिरवळ यांनी २१०० रुपये देण्यावरुन पलटी मारली.
लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी गेमचेंजर ठरली. महायुतीचे घटक पक्ष भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयामध्ये या योजनेचा वाटा महत्त्वाचा ठरला. कारण महायुतीचे सरकार आल्यास लाडक्या बहिणींना दरमहा २१०० रुपये देऊ, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, महायुती सरकार पुन्हा सत्तेत येऊनदेखील लाडक्या बहिणींच्या हप्त्यामध्ये पुन्हा वाढ न करण्यात आल्याने विरोधकांकडून सवाल उपस्थित करण्यात येत आहेत. त्यावर जाहीरनामा ५ वर्षांसाठी असतो, असे उत्तर सत्त्ताधाºयांकडून देण्यात आले आहे. मात्र, आता तर १५०० रुपयांत लाडक्या बहिणी खुश आहेत, २१०० देऊ, असे म्हटलेच नसल्याचे राज्य सरकारमधील मंत्री झिरवळ यांनी म्हटले आहे.