वार्षिक ३८३८.५३ कोटींचा वार्षिक व्यापार ठप्प, महागाई वाढली, औषधांचा तुटवडा,
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी परस्परविरोधात कठोर निर्णय घेतले आहेत. भारताने सिंधू नदीचे पाणी अडविण्याची घोषणा केली, तेव्हा पाकिस्तानने हा निर्णय युद्ध छेडण्यासारखा आहे, अशी पोकळ दर्पोक्ती पाकिस्तानने केली. त्यानंतर पाकिस्तानने भारतासोबतच्या व्यापारावर बंदी घातली. यामुळे भारत आणि पाकिस्तानचा साधारण ३८०० कोटींचा व्यापार ठप्प होणार आहे. यामुळे पाक नागरिकांना महागाईच्या झळा सोसाव्या लागणार आहेत. तसेच पाकिस्तानला औषधांसाठी भारतावर अवलंबून राहावे लागते. यामुळे औषधांचा तुटवडाही निर्माण झाला आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलायला सुरुवात केल्यानंतर पाकिस्ताननेही भारतासोबतच्या व्यापारावर बंदी घातली. मुळात वाघा बॉर्डरच्या माध्यमातून भारत आणि पाकिस्तान यांच्यात दरवर्षी साधारण ३८३८.५३ कोटींचा द्विपक्षीय व्यापार होतो. लँड पोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने दिलेला हा आकडा आहे. यात भारताचा पाकिस्तानच्या मार्गाने अफगाणिस्तान तसेच अन्य देशांसोबत केल्या जाणा-या व्यापाराचाही समावेश आहे. आता हा सर्वच व्यापार थांबला आहे. याचा नकारात्मक परिणाम पाकिस्तानवर होणार आहे. कारण पाकिस्तान ब-याच गोष्टींसाठी भारतावर अवलंबून आहे.
द्विपक्षीय व्यापाराच्या माध्यमातून अनेक गोष्टीची आयात आणि निर्यात होते. भारत पाकिस्तानातून ड्राय फ्रूट्स, जिप्सम, रॉक सॉल्ट यासह इतरही बाबी आयात करतो तर पाकिस्तान भारताकडून औषधी, केमिकल्स, फळे, भाज्या, पोल्ट्री फीड आदी निर्यात करतो. मुळात पाकिस्तानची महागाई गगनाला भिडलेली आहे. चिकन घ्यायचे असेल तर पाकिस्तानात ७९८.८९ पाकिस्तानी रुपये मोजावे लागतात. तसेच एका लिटर दुधासाठी २२४ रुपये मोजावे लागतात. अर्धा किलो ब्रेडसाठी १६१.२८ रुपये, एक डझन अंडी घ्यायची असतील तर ३३२ रुपये, एक डझन केळीसाठी १७६ पाकिस्तानी रुपये मोजावे लागतात. यासोबतच १५० रुपये किलो टोमॅटो आहेत. तसेच एक किलो तांदळासाठी तब्बल ३३९.५६ रुपये मोजावे लागतात. पाकिस्तानात महागाईचा एवढा मोठा आगडोंब उसळलेला असतानाच त्यांनी भारतासोबतच व्यापार बंद केला आहे. त्यामुळे या महागाईच्या झळा आणखी तीव्र होऊ शकतात.
यासोबतच औषध निर्माणासाठी लागणा-या कच्च्या मालासाठी पाकिस्तान साधारण ३० ते ४० टक्के भारतावर अवलंबून आहे. आता द्विपक्षीय व्यापार बंद झाल्याने पाकिस्तानमधील औषध महाग होणार आहेत. त्यासोबतच तुटवडा निर्माण होणार आहे. आता तुटवडा निर्माण होऊ नये, म्हणून पाकिस्तान सरकारने आपत्कालीन उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यासाठी इतर पर्यायी स्रोत शोधण्याचे काम सुरू केले आहे.
चीन, रशिया, युरोपीयन
देशांचा पर्याय शोधणार
पाकिस्तानातील औषध उद्योग काही अंशी भारतातील कच्च्या मालावर अवलंबून आहे. तेथील औषध उत्पादक कंपन्यांना ३० ते ४० टक्के कच्चा माल भारतातून पुरवला जातो. आता दोन्ही देशांतील व्यापार बंद झाल्याने पाकिस्तानने चीन, रशिया आणि युरोपीयन देशांत पर्यायी स्रोतांचा शोध सुरू केला आहे. रबीजविरोधी लस, सर्पदंशावरील औषध, कर्करोगावरील औषध मोनोक्लोनल अँटीबॉडीज व इतर जैविक उत्पादनांसाठी पाक भारतावर अवलंबून आहे.