भारताची योजना, धरण पाकविरुद्ध कोंडीचे मोठे अस्त्र
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ५ मोठे निर्णय घेतले. त्यामध्ये सिंधू जलकरार रद्द करण्याचीही घोषणा करण्यात आली. भारताच्या या निर्णयाने पाकिस्तानच्या तोंडचे पाणी पळाले असून पाकिस्तानचे नेते वाष्फळ बडबड करत आहेत. त्यातच पाकिस्तानची दुखरी नस भारताच्या हातात असून काश्मीरच्या बागलिहार धरणातून पाणी अडवण्याची योजना भारत आखत आहे. हे धरण म्हणजे पाकिस्तानविरुद्धच्या लढाईतील मोठे अस्त्र मानले जाते. त्यामुळेच जल सिंधू करार रद्द करण्याच्या निर्णयाने पाकिस्तानला धडकी भरली.
सन १९९९ पासून पाकिस्तानला जी भीती होती, ती याच बागलिहार धरणाची होती. कारण या डॅमच्या बांधणीला १९९९ सालापासून सुरुवात झाली. या धरणाच्या माध्यमातून चिनाब नदीचे पाकिस्तानला जाणारे पाणी भारत अडवेल. जेव्हा युद्ध होईल, तेव्हा भारत या बागलिहार धरणाचा वापर एक शस्त्र म्हणून करेल. आता भारताने तेच केले आहे, सिंधू जल करार रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने पाकिस्तानला झटका बसला. बागलिहार धरणात चिनाब नदीचे पाणी येते. येथे सरकारने ९०० मेगावॅट हायड्रो इलेक्ट्रीक पॉवर प्रोजेक्ट सुरू केला आहे. पाकिस्तानने या प्रोजेक्टला विरोध केला होता. पण वर्ल्ड बँकेच्या मध्यस्थीनंतर भारताला हा बागलिहार धरण बांधता आले. या धरणाच्या माध्यमातून पाकिस्तानला जाणारे पाणी भारत थांबवू शकतो. तसेच हे थांबलेले पाणी अचानक सोडले तर पाकिस्तानला मोठे नुकसान होऊ शकते.
…तर शेतपिकांचे नुकसान
शेतीच्या पिकांचा हंगाम असताना हे पाणी थांबवले गेल्यास पाकिस्तानमध्ये घेतल्या जाणा-या पिकांना मोठा फटका बसू शकतो आणि पाणी साठवून अचानकपणे पाकिस्तानमध्ये सोडल्यास पाकिस्तानमध्ये मोठा पूर येऊ शकतो. बागलिहार धरणाचे पाणी हे पाकिस्तानच्या शेतीविषयक उद्योगालाही मोठा फटका बसवणारे आहे.