बागलीहारमध्ये रोखले चिनाबचे पाणी, पाकच्या तोंडचे पाणी पळाले
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानची सर्व बाजूंनी मुस्कटदाबी सुरू केली असून, सिंधू पाणी वाटप करार रद्द केल्यानंतर वुलर सरोवराचे पाणी पाकिस्तानसाठी बंद केले. आता त्यापुढे जाऊन चिनाब नदीवर असलेल्या बागलीहार प्रकल्पाचे पाणी अडवण्याचा निर्णय रविवार, दि. ४ मे २०२५ रोजी घेतला. हा पाकिस्तानसाठी मोठा धक्का आहे. कारण यापुढे भारत बागलीहार धरणातून पाणी जाऊ देणार नाही. त्यामुळे पाकिस्तानच्या शेतीसोबत वीज प्रकल्पही अडचणी येऊ शकतात.
जम्मू-कश्मीरमधील बागलीहार जलविद्युत प्रकल्प पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानमधील वादाचा केंद्रबिंदू ठरला आहे. भारताने सिंधू पाणी वाटप करार रद्द केल्यानंतर आता चिनाब नदीचे पाणी बागलीहार धरणाद्वारे रोखण्याचा निर्णय घेतला. जम्मूच्या रामबनमध्ये असलेल्या बागलीहार प्रकल्पातील पाण्याचे वहन नियंत्रित करण्याची भारताकडे क्षमता आहे. तसेच झेलम नदीवर असलेल्या किशनगंगा प्रकल्पासंदर्भातही भारत लवकरच कडक निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.
बागलीहार धरण हा भारत आणि पाकिस्तानमधील अनेक वर्षांपासूनचा वादाचा मुद्दा आहे. पाकिस्तानने यापूर्वीही याबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेषत: जागतिक बँकेकडे मध्यस्थीची मागणी केली होती. त्याचप्रमाणे किशनगंगा प्रकल्पामुळे नीलम (झेलमची उपनदी) नदीच्या प्रवाहावर होणा-या परिणामांविषयीही पाकिस्तानने आक्षेप नोंदवले आहेत.
१९६० मध्ये सिंधू पाणी वाटप करार
भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे राष्ट्रपती अयुब खान यांच्या पुढाकाराने १९६० मध्ये सिंधू पाणी वाटप करार केला होता. त्यानुसार रावी, बियास आणि सतलज नद्यांच्या पाण्याचे अधिकार भारताच्या नियंत्रणात तर सिंधू, चिनाब व झेलम नद्या पाकिस्तानच्या नियंत्रणात राहिल्या. मात्र, भारताला काही प्रमाणात सिंचन, वीज निर्मिती आणि घरगुती वापरासाठी पाण्याचा वापर करण्याची मुभा देण्यात आली होती. पाकिस्तानची कृषीप्रधान अर्थव्यवस्था मुख्यत्वे सिंधू नदीवर अवलंबून आहे. पाकिस्तान आपल्या पाण्याच्या ९३ टक्के गरजा या पाश्चिमेकडील नद्यांमधून पूर्ण करतो. देशातील सुमारे ८० टक्के शेती सिंधू प्रणालीच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे भारताने सिंधू पाणी वाटप करार रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तानमधील राजकीय आणि लष्करी पातळीवर अस्वस्थता वाढली आहे.