शेतकरी उतरले रस्त्यावर, कृषिदिनी जमीन मोजणी रोखली
कोल्हापूर : प्रतिनिधी
नागपूर ते गोवा प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात मंगळवारी राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये शेतक-यांनी एल्गार पुकारला. कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग सुमारे दीड तास रोखून सरकारला सज्जड इशारा दिला. कोणत्याही परिस्थितीत शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही, अशी भूमिका शेतक-यांनी घेतल्याने आता सरकारची चांगलीच कोंडी होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणारा नागपूर ते गोवा या शक्तिपीठ महामार्गाला सुरुवातीपासूनच विरोध होऊ लागला आहे. १२ जिल्ह्यांतून जाणा-या या शक्तिपीठ महामार्गासाठी ८६ हजार कोटीचा चुराडा होणार आहे तर हजारो हेक्टर सुपीक जमीन ही या महामार्गामुळे बाधित होणार आहे. त्यातच शेतक-यांना तुलनेत कमी मोबदला मिळणार असल्याने शेतक-यांनी शक्तिपीठ महामार्गाविरोधात कृती समितीच्या माध्यमातून राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये अक्षरश: रान पेटवले आहे.
सोमवारी कोल्हापूरसह बारा जिल्ह्यात रास्ता रोको आंदोलन करत सरकारला पावसाळ््यातही शेतक-यांनी चांगलाच घाम फोडला. कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पंचगंगा नदीजवळ महामार्ग रोको आंदोलन केले. यावेळी शेकडो शेतक-यांनी घोषणाबाजी करत शक्तिपीठ रद्द झालाच पाहिजे, असा नारा दिला.
कोल्हापुरात सकाळी १० पासून मोठ्या संख्येने शेतकरी पंचगंगा पुलावती जमायला सुरुवात झाली. यावेळी शेतक-यांनी हातात फलक घेऊन शक्तिपीठ महामार्गाला तीव्र विरोध असल्याचे निदर्शनास आणून दिले. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता.
शेतकरी आक्रमक
कोल्हापुरात सकाळी १० पासून मोठ्या संख्येने शेतकरी पंचगंगा पुलावती जमायला सुरुवात झाली. यावेळी शेतक-यांनी हातात फलक घेऊन शक्तिपीठ महामार्गाला तीव्र विरोध असल्याचे निदर्शनास आणून दिले. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. शक्तिपीठ महामार्ग रद्द करेपर्यंत लढाई सुरू राहणार असल्याचा निर्धार शेतक-यांनी बोलून दाखविला.
पंचगंगेत उडी मारण्याचा प्रयत्न
शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा यासाठी कोल्हापुरात सुरू असणा-या रास्ता रोको आंदोलनादरम्यान काही शेतक-यांनी पंचगंगा नदी पात्रात उड्या मारण्याचाही प्रयत्न केला.
जमीन मोजणी करणा-या कर्मचा-यांना पिटाळले
कृषिदिनी लातूर, परभणी जिल्ह्यात शक्तिपीठ महामार्गासाठी जमीन मोजण्याकरिता कर्मचारी दाखल झाले होते. या कर्मचा-यांना जमीन मोजणीसाठी शेतक-यांनी कडाडून विरोध केला आणि जमीन न मोजताच पिटाळून लावले. लातूर तालुक्यातील ढोकी (येळी) येथे मंगळवारी जमीन मोजणीसाठी पथक पोहोचले, त्यावेळी शेतक-यांनी जमीन मोजणीस विरोध केला. यावेळी शेतकरी आक्रमक झाल्याने पथकाला जमीन न मोजताच परत फिरावे लागले. परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातही आक्रमक झालेल्या शेतक-यांनी मोजणी पथकाला जमीन मोजू दिली नाही.